गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
ईसापुर-पिंपळवाडी, ९ डिसेंबर: स्वातंत्र्यकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या ईसापुर-पिंपळवाडी येथे अखेर विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणाने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.
विशेषतः विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेली ही बससेवा शिक्षणासाठी प्रवास सुलभ आणि सुरक्षित बनवणार आहे. स्वातंत्र्यकाळापासून या भागात बससेवा नव्हती, त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बससेवेच्या चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी या सेवेमुळे मिळणाऱ्या सोयींचे कौतुक करत, प्रशासनाचे आभार मानले आणि या उपक्रमाची नियमितता राखली जावी, अशी विनंती केली.
कार्यक्रमात किसन नाईक, सतोश नाईक, शंकरराव रतवार, अवधूत मारकवार, रतन जाधव, विनोद कारभारी, राजू मारकवार, संदेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे, पत्रकार संजय जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे, असे उपस्थितांनी नमूद केले. या ऐतिहासिक पावलामुळे ईसापुर-पिंपळवाडी गावाच्या विकासाला नवा आयाम मिळाला आहे.


