अकोला विभाग :- गणेश वाडेकर
दि. ०३ऑगस्ट २०२५ रोजी, अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दला तर्फे श्री. अर्चित चांडक साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष निर्देश देण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे एकूण 98 जणांवर संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. याशिवाय, कलम ८५, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत २ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सण-उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, तसेच त्यातून निर्माण होणारा गोंधळ, भांडणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न रोखण्यासाठी अकोला पोलीसांकडून अशा विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदार यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गोंधळ घालणे, किंवा इतर कोणत्याही प्रकारचे असामाजिक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
याबाबत माहिती देताना अकोला पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि यामुळे केवळ स्वतःचीच नाही तर इतरांचीही सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा कृत्यांपासून दूर राहावे, तसेच परिसरात कुठेही मद्यपान करून गैरवर्तन होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे.

