कंधार प्रतिनिधी.:- ज्ञानेश्वर कागणे
कंधार ग्रामीण रुग्नालयात उंदरांनी रुग्णांसोबत मैत्री केली असून ते रुग्णांच्या अंगावर खेळत असून या रुग्णालयाच्या अजब कारभाराची तालुकाभर चर्चा होत आहे.
येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर कदम हे नांदेड येथे खाजगी व्यवसायात गुंग असल्याने ते आठवड्यातून एखादा दिवस रुग्णालयाला भेट देतात. त्यामुळे येथील रुग्णालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे.
या ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीला जवळपास अकरा वैद्यकीय अधिकारी,एक दंतशल्य चिकीत्सक, एक वैधकीय अधिक्षक आहेत. कंधार शहर व परिसरात अनेक गोरगरीब रुग्ण असून ते या ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. परंतू एवढे अधिकारी असूनही वेळेवर कोणीही येत नाहीत त्यामुळे रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते.
सकाळी रुग्णालयाची वेळ नऊ वाजताची आहे पण अनेकवेळा दहा वाजे पर्यंत एकही डॉक्टर येत नाहीत.तसेच बारा वाजेच्या आत निघूनही जातात. यातील अनेक डॉक्टरांचे कंधार शहरात खाजगी दवाखाने असल्याची माहीती असून ते शासकीय वेळेत आपल्या खाजगी दवाखान्यात जाऊन बसतात अशी अनेकांची तक्रार असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
परंतु याठिकाणी प्रशासकीय अधिका -यांचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य वाढून उंदीरासारखे प्राणी तेथे वास्तव्य करत आहेत.
हेच उंदीरमामा सरळ रुग्णांच्या अंगावर येऊन खेळत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसिद्ध झाला असून या रुग्णालयाच्या प्रशासनाविरुद्ध जनतेत चीड निर्माण होत आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी योग्य दखल घेऊन संबंधीत दोषी अधिकारी व कर्मचार्यांविरुध योग्यती कारवाई करणे गरजेचे आहे.


