कंधार प्रतिनिधी – ज्ञानेश्वर कागणे
तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर गावागावात राजकीय हालचालींना नवे वळण मिळू लागले असून, अनेक ठिकाणी “मीच होणार सरपंच” म्हणणाऱ्या भावी उमेदवारांनी थेट प्रचारयुद्ध सुरू केल्याचे चित्र आहे.
नव्या नेतृत्वाच्या आशेवर गावकरी नजर ठेवून आहेत, तर जुन्या सत्ताधाऱ्यांना नवा धोका जाणवू लागला आहेगेल्या काही दिवसांपासून सरपंच आरक्षण सोडतीकडे अनेकांचा कटाक्ष होता. आरक्षण जाहीर होताच अनेक गावांमध्ये सत्ताधाऱ्यांचे गणित बिघडले, तर काहींना संधी मिळाल्याने आनंद ओसंडून वाहतोय. काही ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती (एस.सी./एस.टी.) या प्रवर्गांसाठी आरक्षण निघाल्याने, त्या गावात केवळ एक-दोन कुटुंबांमधून उमेदवार ठरवावा लागणार आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांसमोरही नवा पेच उभा राहिला आहे.
“भावी सरपंच” हवेत!
गावागावात हौसे-गवसे उमेदवार उभे राहू लागले आहेत. काही ठिकाणी तर चौकात, वाड्यात, चावडीत थेट ‘मीच सरपंच’ अशा घोषणांनी ग्रामपंचायतीच्या राजकारणात एक वेगळीच चुरस निर्माण झाली आहे. कुणी फॉर्च्यूनर गाडीतून फिरत तर कोणी म्हणत माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे फक्त केवळ तुमची सेवा आहे अशाप्रकारे जोरदार प्रचार चालू आहे त्यामुळे जुन्या मातब्बर नेत्यांची चिंता वाढली असून, आगामी निवडणुकीचा रंग जोरदार लागण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक थेट जनतेतून; स्पर्धेला धार
यावेळीही सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने, गावात थेट लोकांच्या संपर्कासाठी उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. गावाच्या विकासाचे स्वप्न, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, वीज, गटारीसारख्या प्राथमिक सुविधा या मुद्द्यांवर प्रचार जोर धरू लागला आहे. गावकऱ्यांमध्येही ‘कोण आपला’, ‘कोण उपयोगाचा’ याची चर्चा रंगू लागली आहे.
खर्चाचे गणितही महत्त्वाचे!
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सदस्यांना फारसे महत्त्व नसेल, कारण थेट सरपंच निवड होत आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा भार भावी सरपंचांवरच असणार आहे. गावातील विविध गट-तटांच्या बैठका, घरभेटी, प्रचार साहित्य यावर लाखो रुपयांचा खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे केवळ हौसे उमेदवार नव्हे, तर आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातूनही सक्षम उमेदवारच शर्यतीत टिकणार असे तज्ज्ञांचे मत आहे.
🏫ग्रामविकासाच्या दिशेने…?
ग्रामपंचायती हा गावाच्या विकासाचा कणा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या जातात. त्यामुळे गावच्या प्रश्नांची जाण असलेल्या, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. मात्र सध्या तरी “मीच सरपंच” या घोषवाक्यांच्या गजरात वास्तवाचा गांभीर्याने विचार होईल का? हा प्रश्न ग्रामस्थांना पडतोय. मात्र जनता थेट जनतेतून निवड असल्यामुळे खिशाने बळकट असणाऱ्यांना साथ देणार की विकासाचे ध्येय ठेवून येणाऱ्या भविष्यकाळात पुढे येणाऱ्या नव तारुण्याला संधी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

