कारगिल विजय दिवस निमित्त पत्रकार अविनाश भोपेचे कथन
पुलगाव – विदर्भ प्रमुख प्रतिनीधी :- युसुफ पठाण
तळहातावर शीर घेऊन सीमेवर रक्षण करणारा जवान आपले प्रामाणिक कर्तव्य बजावतो, म्हणूनच आम्ही सुखाचा श्वास घेऊ शकतो. निश्चित जीवन जगू शकतो. त्यामुळे राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवून मी देशासाठी काय करू शकतो? याचे चिंतन करावे “. असे प्रतिपादन मातृसेवा परिवाराचे संस्थापक अविनाश भोपे यांनी केले.
आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव येथे कारगिल विजय दिवस निमित्त विशेष उद्बोधन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे गटनिदेशक शंकर हुलके तसेच मुख्य उपस्थिती संस्थेच्या गटनिदेशीका सौ. स्वाती ठाकरे या होत्या. विजय दिवस कार्यक्रमाचे निमित्त मुख्य वक्ते म्हणून मातृसेवा परिवाराचे संस्थापक व पत्रकार अविनाश भोपे हे होते.

यावेळी बोलताना अविनाश भोपे पुढे म्हणाले,” कारगिलच्या युद्धामध्ये दोन लाख जवानांनी सहभागी झाले. त्यापैकी ५२७ जवान शहीद झाले. अठरा हजार फुट उंचीवर व उणे २८ डिग्री तापमानावर खालून वर लढत जाणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांचे साहस व शौर्याचे वर्णन म्हणजे प्रत्येक सैनिकांच्या शौर्य गाथेचा एक एक इतिहास आहे. मेजर कालिया, कॅप्टन मनोज पांडे, कॅप्टन भूषण बत्रा यांच्या साहसाच्या वीरकथा त्यांनी कथन केल्या. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास करून विद्यार्थ्यांनी देशाच्या संरक्षण सेवेत आपली सेवा द्यावी असे आवाहन अविनाश भोपे यांनी केले.
शारदा माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत पांडे शिल्प निदेशक यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद व ३०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


