विदर्भ विभाग: युसूफ पठाण
जिल्ह्यात 2 लाख रुग्णांची होणार मोफत तपासणी
पाच हजार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची संकल्पना
22 ला अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समित्या
तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.
मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल मोतिबिंदू विरहीत वर्धा जिल्हा हे अभियान पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र तपासणी शिबिर घेतले जात आहे.
या शिबिरांमध्ये तब्बल 2 लाखावर रुग्णांची तपासणी व 5 हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि.22 जुलै रोजी चरखा सभागृह येथे होणार आहे.

जिल्हास्तरीय शुभारंभ व अभियानाच्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय शुभारंभाच्या यशस्वीतेसाठी 27 समित्यांचे गठण करण्यात आले आहे. समिती प्रमुखांसह जबाबदारी सोपविलेले इतर अधिकारी, कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.
चरखा सभागृह येथे जिल्हास्तरीय शुभारंभाला अनेक मंत्री व अन्य अतिथी उपस्थित राहणार आहे. भव्य स्वरुपात आयोजित शुभारंभ व आरोग्य तपासणीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गठीत समितीच्या प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात मोतिबिंदू विरहीत अभियान आरोग्य विभाग, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, वर्धा नेत्र चिकित्सा असोशिएशन, खाजगी नेत्रतज्ज्ञांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
शिबिरात नि:शुल्क मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत तज्ञांमार्फत दंतरोग तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व औषधोपचार केले जाणार आहे. तसेच आयुष्मान कार्ड नोंदणी व शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवार दि.22 जुलै रोजी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ व वर्धा तालुकास्तरीय शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सर्व आठही तालुक्यात एकून 8 तपासणी शिबिरे होणार आहे. सर्व ठिकाणी तज्ञ डॅाक्टर्स उपस्थित राहतील. या डॅाक्टर्सच्यावतीने 2 लाखावर अधिक मोतिबिंदू, नेत्र व इतर आजाराची तपासणी करण्यात येणार असून शस्त्रक्रियांची आवश्यकता असलेल्या जवळपास 5 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. वर्धा शहरातील तीन वेगवेगळ्या रुग्णालयांसह नागपूर येथील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील.

अभियान 22 जुलै रोजी सुरु होऊन दि.14 ऑगस्टपर्यंत संपणार आहे.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती व कार्यकारी समिती अशा दोन समित्या करण्यात आल्या आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समित्या करण्यात आल्या आहे. या समित्या रुग्णांची नोंदणी, त्यांची शिबिराच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था, तपासणीच्या दिवसाचे नियोजन आदींचे सुक्ष्म नियोजन करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे चोखपणे नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत केल्या.

