महिन्याचे बिल भरूनही चोरीच्या नावाखाली महावितरणची ग्राहकांकडून लूट – आजाद समाज पार्टी आक्रमक
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
आरमोरी : तालुक्यातील विविध गावकऱ्यांच्या विज व मीटर विषयक समस्या तसेच महावितरण च्या बोगस कारभाराविरोधात आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे यांच्या पुढाकाराने आरमोरी महावितरण कार्यालयास घेराव घालण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्राहकांची कुठलीही पूर्व परवानगी, शासकीय आदेश , मीटर बाबत तक्रार नसताना महावितरण विभागाने अनेक गावातील ग्राहकांचे मीटर जबरदस्तीने बदलले. वास्तविक मिटर बिघाड असल्याची तक्रार नसताना ते बदलणे म्हणजे महावितरण चा मनमानी कारभार झाला. जे मीटर लावले त्यामध्ये 500 रुपये येणारे बिल 3000 येत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी आजाद समाज पार्टी कडे केली होती. याबाबत अभियंता बागुलकर यांना राज बन्सोड यांनी चांगलेच धारेवर धरले. जाब विचारणा केली असता त्यांनी कुठलीही नोटिफिकेशन, गाईडलाईन किंवा आदेश प्रत दिली नाही. तसेच सुरज देशमुख नामक कर्मचारी आदेशाविना बळजबरी ग्राहकांच्या घरी जाऊन अरेरावी पणा करत असल्याने त्याला तात्काळ निलंबणाची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
मीटर बिघाड बाबत ग्राहकांची कुठलीही तक्रार नसताना महावितरण ने ग्राहकांची परवानगी न घेता परस्पर विजमीटर बदलले. आणि काही नागरिकांनी मीटर बिघाड असल्याच्या तक्रारी 6 महिन्यापासून देऊन सुद्धा त्यांचे मीटर अद्याप बदलले नाही. व मनमानी विज बिल आकारण्यात येत आहे.
गंभीर बाब म्हणजे काही ग्राहकांच्या घरावर महावितरण च्या भरारी पथकाने धाड टाकून जे ग्राहक दर महिन्याला न चुकता बिल भरतात व ज्यांची वय 75-80 आहे, त्यांच्यावर लाईन चोरीचा बेसुमार आरोप करत 56-56 हजाराचा फाईन लादण्यात आला. ही फार गंभीर बाब असून सामान्य नागरिकांची ही लूट असल्याचा आरोप आजाद पार्टी ने केला.
महावितरण प्रशासनाने ही बाब आमच्या हातात नाही तर जिल्हा कार्यालयाच्या अधिनस्त असल्याचे सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
याबाबत आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी संतप्त होत लवकरच मुख्य अभियंत्यास घेरणार असून महावितरण च्या बोगस कारभाराविरोधात आवाज उठविणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. आंदोलन स्थळी पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सतीश दुर्गमवार, धनराज दामले, लकी पाटील, भारत मेश्राम, विनोद दुमाने, टारझन निमगडे तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

