पाच जणांवर गुन्हा दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
पोलीस पथक दि. १५ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हिंगणघाट येथून आदिलाबादकडे जात असलेल्या एका पिकअप वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात आहेत.
या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत पांढरकवडा ते पाटणबोरी दरम्यान संबंधित वाहनाची शोधमोहीम राबवली. या मोहिमे दरम्यान एक अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची एम.एच. ३१/एफ.सी.८५९६ क्रमांकाची पिकअप आढळून आली.
वाहन थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे निर्दयपणे दाटीवाटीने कोंबलेली आढळून आली. जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधण्यात आले होते आणि त्यांना हालचालीसाठी पुरेशी जागाही दिलेली नव्हती.
- त्यापैकी एक गाय मृतावस्थेत होती.

वाहनात एकूण ११ गायी होत्या. अंदाजे किंमतीनुसार या गायींची एकूण किंमत ५५,००० इतकी आहे. त्याशिवाय घटनास्थळी पोलिसांनी व्हिवो मोबाईल (किंमत ४,०००/-) आणि अशोक लेलँड वाहन (किंमत ११ लाख) असा एकूण ११ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रणय निरंजन सगुने (१९), रा. नागपूर असे सांगितले. त्याने पोलीसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, सदर गोवंशीय जनावरे महेश सूर्यभान लोंढे (३५), रा. नागपूर, शाहीद अफजलखान कुरेशी (३०), रा. हिंगणघाट, शक्ती शेषराव कनाके (३८), रा. पाटणबोरी, स्वप्नील कनाके (२५) रा. नागपूर यांच्या सांगण्यावरून आदिलाबादकडे नेत असल्याचे स्पष्ट केले.
या घटने प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित वाहन व जनावरे ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

