कंधार प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर कागणे
कंधार तालुक्यातील वंजारवाडी गावात जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून त्यामुळे अनेक जनावरे दगावली आहेत परंतू या कडे पशूवेद्यकीय प्रशासन मात्र साफ डोळेझाक करत असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.मागील काही वर्षात महाराष्ट्रात लम्पी आजाराने हैदोस घातला होता.
मध्यंतरीच्या काळात हा आजार कमी झाला असे वाटत असतानाच या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून ऐन पेरणीच्या मोसमात जनावरांना या रोगाची लागण झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून मौ. वंजारवाडी या गावातील जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून सुद्धा लाल कंधारी वळू मरणाच्या वाटेवर आहे असे सांगत असताना शामराव गंगाधर गीते या पशुपालकाच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि गावातील५ – ६ जनावरे मरण पावली आहेत तर काही शेतकर्यांनी आपली जनावरे कवडीमोल किंमतीत कसायाला विकून टाकली आहेत.
अजूनही वंजारवाडी या गावांत १०-१५ जनावरांना या आजाराची लागण असून आतापर्यंत एकही पशुवैद्यकीय अधिकारी या गावांत फिरकला नाही.
याचे कारण विठ्ठल जायभाये हा व्यक्ती थोड्याफार माहितीच्या आधारे कंधार शहर लगतच्या गावामध्ये प्रॅक्टिस करतो यामुळे प्रशासनाला जर माहिती सांगितली तर आपली दुकान बंद पडेल या कारणास्तव प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळाली नसेल का?
असा प्रश्न उपस्थित होतो किंवा यामध्ये प्रशासकीय डॉक्टरच अशा लोकांना हाताशी धरून आपले काम भागवतात का?
कंधार शहरातही कांही गायींना या रोगाची लागण झाली असून यापासून इतर जनावरांना लागण होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त इतरही गावांत हा आजार पसरल्याची माहीती असून याला वेळीच उपचार करून आळा घातला तर ठीक अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
या आजाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना या संकटातून मुक्त करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

