अकोला विभाग प्रतिनिधी: – इम्रान खान सरफराज खान
स्थळ: मोमिनपुरा मस्जिद, अकोला रविवार, १३ जुलै २०२५
अकोला:राईट वे फाउंडेशन, अकोला यांच्या वतीने एक अभिनव व समावेशक उपक्रम म्हणून “मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम” रविवार दिनांक १३ जुलै रोजी मोमिनपुरा मस्जिद प्रांगणात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम विशेषतः अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आयोजित केला गेला होता.
ज्यामध्ये इस्लाम धर्माची मूलभूत तत्त्वे, मस्जिदचे महत्त्व आणि कुरआनमध्ये माणुसकीस दिलेले स्थान याबाबत सखोल माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मौलाना इस्माईल काश्मीरी होते, ज्यांनी विविध धार्मिक व सामाजिक बाबींवर सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राईट वे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन होते.
स्वागत भाषणात त्यांनी सांगितले,”इस्लाम विषयी पसरलेल्या गैरसमजांना दूर करून संवाद व समजुतीच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देणे हा आमचा उद्देश आहे. मस्जिद ही द्वेष नव्हे, तर प्रेम व माणुसकीचा संदेश देणारी जागा आहे.”कार्यक्रमाची प्रस्तावना जहूर सर यांनी केली.
मस्जिद परिचय अमिन सर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन यांनी केले.या कार्यक्रमात खालील प्रमुख विषयांवर संवाद व माहिती देण्यात आली:

🔹 इस्लाम म्हणजे काय?इस्लाम म्हणजे “शांती” व “समर्पण”. हा धर्म माणुसकी, न्याय, करुणा व समानतेवर आधारलेला आहे.
🔹 अजान म्हणजे काय आणि त्याचा अर्थ:अजान ही मानवजातीला नमाज/उपासनेसाठी दिलेली साद आहे. याचा अर्थ – “अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूजनीय नाही, मोहम्मद (स.) हे त्याचे संदेष्टा आहेत. चला नमाजीकडे, चला यशाकडे.”
🔹 मस्जिदचे महत्त्व:मस्जिद ही केवळ नमाज अदा करण्याचे ठिकाण नसून, ती सामाजिक एकोपा, शिक्षण, सेवा आणि सौहार्दाचे केंद्र आहे.
🔹 कुरआन आणि माणुसकी:कुरआन माणुसकीला सर्वोच्च मानतो. त्यात लिहिले आहे की, “एका जीवाचे रक्षण करणे म्हणजे संपूर्ण मानवतेचे रक्षण करणे.” इस्लाम हा धर्म कधीही जबरदस्ती करत नाही, तर विचार, करुणा आणि सुसंवाद याचा संदेश देतो.
या कार्यक्रमात पत्रकारांना मस्जिदची प्रत्यक्ष फेरफटका मारून माहिती देण्यात आली, ज्यामध्ये नमाज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक, वुज़ू (शुचिर्भूत होणे), मिंबर (उपदेश स्थळ), कुरआन आणि इतर सामाजिक उपक्रम दाखवण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांना इस्लाम आणि मस्जिद संदर्भातील माहितीपूर्ण साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.
राईट वे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन यांनी समारोप भाषणात सर्व पत्रकारांचे आभार मानले आणि सांगितले:
“संवाद आणि समजुतीच्या माध्यमातूनच द्वेषाची भिंत कोसळेल आणि सर्व धर्मांमध्ये खरी बंधुभावाची भावना निर्माण होईल.”कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये राईट वे फाउंडेशनचे ऑड अफजल गाजी, अमिन सर,जहूर सर, मोहम्मद जावेद, अली सर, मोहम्मद सलीम ,अब्दुल हादी , अंजार हुसैन, सादिक अली, वसीम अहमद खान, औरंगजेब हुसैन , डॉ जाकिर अली, अजहर हुसैन मुतावल्ली , मस्जिद प्रशासन व स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले.

