पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे हरिभाऊ रघुनाथ गायकवाड (रा. तळेगाव-ढमढेरे, ता.शिरूर) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांनी व्यवसायासाठी २०१८ मध्ये शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीच्या शाखेकडे पाच लाख रुपयांची कर्ज मागणी केली. शिक्रापूर शाखेतील सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील यांनी गायकवाड यांचेशी चर्चा करून ‘फायनान्स करू, त्यासाठी गहाण म्हणून घर, शेती जे काही असेल ते द्यावे लागेल.’ असे सांगितले होते. यानंतर गायकवाड यांनी राहत्या घराची सर्व कागदपत्रे देत महिंद्रा फायनान्सच्या नावाने घराचे गहाणखत केले. पुढील काळात महिंद्रा फायनान्स कंपनीने काही हप्ते भरण्यास सांगितल्यावरून त्यांनी काही हप्तेही भरले. मात्र, त्यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यास कंपनी टाळू लागली. या प्रकारामुळे गायकवाड हतबल झाले होते. गायकवाड यांनी महिंद्रा फायनान्सचे पुणे येथील कार्यालय गाठले. पुणे कार्यालयात त्यांना ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कर्जाचा धनादेश आम्ही देणार नाही,’ असे सांगितले.
दरम्यान, कर्ज राहू दे ‘गहाणखत तरी रद्द करा,’ असे गायकवाड यांनी सांगितले. त्यावर ‘अरेरावी आणि तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही कर्जधनादेश देणार नाही. गहाणखतही बदलणार नाही’, असे सांगितले. या सर्व प्रकाराला कंटाळून हरिभाऊ गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे. हरिभाऊ गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


