लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
ॲम्बुलन्स आणि डॉक्टरही उपलब्ध होत नसल्याचा अनुभव त्यांनी विधानसभेत सांगितलारोड सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करण्याची केली मागणी..
मुंबई : आज शुक्रवार 11 जुलै 25 :
राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी
म्हणून उपाययोजना आहेत मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने
मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे, हे रोखण्यासाठी तसेच
दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड
सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान
राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी
या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एका
अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मागच्या
आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जात
असताना औसा तालुक्यात दोन दुचाकीचा अपघात झाला, ज्यात दोघे गंभीर जखमी
झाले होते. त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मी स्वतः १०८
क्रमांकावर फोन केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंर औसा शासकीय
रुग्णालयात संपर्क साधला पण तेथेही डॉक्टर, कंपाउंडर कोणीही उपलब्ध
नव्हते. शेवटी त्या दोघा जखमींना माझ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी
पाठवले. दुर्दैवाने त्यातील एकाचा मृत्यू झाला परंतु एकाचा जीव वाचला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून
राज्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभारले आहे, दुर्दैवाने राज्यातील
रस्त्यावर “रस्ता सुरक्षा प्रणाली” कार्यान्वीत असल्याचे दिसून येत नाही,
सर्वच रस्त्यांच्या बाजूला धाबे आणि हॉटेलची गर्दी आहे. अपघात प्रवण
ठिकाणी कोणत्याच सुरक्षेच्या व्यवस्था नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण
दिवसेंदिवस वाढत आहे, यातून मोठी जीवितहानी होत आहे, शिवाय जखमींची
संख्याही वाढते आहे. असे नमूद करून या संदर्भाने तातडीने उपाययोजना
कराव्यात, अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली.
या लक्षवेधी सूचनेवर सरकारच्या वतीने बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, बांधकाम विभागाकडून धाबे हॉटेल बांधण्यास
लागणाऱ्या परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग देत नाही. केवळ हे धाबे व
हॉटेल रस्त्यांपासून किती अंतरावर असावेत हे ठरवण्याचे अधिकार आमच्या
विभागाकडे आहेत. गावाशेजारी राष्ट्रीय महामार्ग बंद करता येत नाही
त्यामुळे कधी कधी दुचाकी, बैलगाडी, जनावरे रस्त्यावर येण्याने अपघाताच्या
घटना घडतात, हे अपघात कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, शिवाय
अपघात प्रवण क्षेत्रात आवश्यक त्या सूचनाफलकांची उभारणी करण्यात येत आहे.
अपघातग्रस्तांना लवकर उपचार मिळावेत म्हणूनही अनेक ठिकाणी सुविधा निर्माण
केलेल्या आहेत, ॲम्बुलन्स सर्व टोल नाक्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात असेही
त्यांनी यावेळी सांगितले. तालिका अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी या चर्चेत
हस्तक्षेप करून राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे ब्लॅक स्पॉट किती
दिवसात कमी करणार, असा प्रश्न मंत्रीमहोदयांना विचारल्यानंतर त्यावर
त्यानी सहा महिन्यात हे स्पॉट कमी करण्याचे प्रयत्न केले जातील असे उत्तर
दिले.
ख्रिस्ती समाजाच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले
सकल ख्रिस्ती समाजाकडून मुंबई येथील आझाद मैनावर आयोजित केलेल्या
आंदोलनाकडे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत
पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले,
ख्रिस्ती समाजातील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी शासनाने त्वरीत प्रयत्न
करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

