गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
एटापल्ली, –
एटापल्ली नगरपंचायत हद्दीतील आठवडी बाजारातून वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा महसूल मिळत असताना देखील त्या परिसरातील मूलभूत सुविधा पूर्णपणे हरवलेल्या आहेत. पावसाळ्यात बाजारवाडी संपूर्ण चिखलमय होते, नागरिक व व्यापाऱ्यांना रस्त्यावर चालणेही कठीण होते. रोगराईचे संकट निर्माण होत असूनही, मुख्याधिकारी, नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक या गंभीर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार यांनी आज यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र नाराजी नोंदवला. “बाजारातून लाखोंचा लिलाव करून नगरपंचायत कमाई करते, पण त्या पैशातून पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी नाही. ही जनतेच्या मेहनतीची लूट असून सत्ताधाऱ्यांचा असंवेदनशील आणि जनविरोधी चेहरा उघड करणारी बाब आहे,” असे गुज्जलवार यांनी म्हटले.
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जनतेला रोग, अस्वच्छता आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. हा फक्त प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही, तर जनतेविरोधी धोरणाचाच भाग आहे. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याच्या निचऱ्याची, व कचरा व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था नसताना दर आठवड्याला बाजार भरवणं म्हणजे गरिबांच्या जीवाशी खेळ आहे.
भाकपाने बाजारातील चिखल हटवणे, सिमेंट काँक्रिट रस्ता करणे, शौचालय आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे यांसारख्या मागण्या प्रशासनापुढे मांडल्या आहेत. जर तात्काळ कार्यवाही न झाली तर भाकपा रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

