लिंकिंग करणाऱ्या कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली : खरीप हंगामास सुरुवात झाली असून शेतकरी बांधवाना खत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक बाब झाली आहे. मात्र अशा परिस्थिती मध्ये कंपन्याच्या मनमानी मुळे व शासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात कुठेही खताचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. प्रीती हिरवळकर यांच्या मार्फत कृषमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले व mail सुद्धा करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ज्या कंपनीचे खत मार्केट मध्ये आहे त्या खत पुरवठादार कंपन्या जसे आर. सी. एफ., कोरोमंडल, एन. एफ. एल. बंबल, इफको, दीपक फर्टीलायझर, पी.पी. एल. अशा कंपन्याचे खते रँक पॉईंट वर येत आहेत पण या कंपन्या खतासोबत लिंकिंग स्वरूपात अनावश्यक दुय्यम खते, कीटक नाशक, औषध्या विक्रेत्यांना घेण्यास जबरदस्ती करीत आहेत. जर विक्रेत्यांनी घेण्यासाठी विरोध केला तर खताचा पुरवठा देत नाही. परिणामी विक्रेत्यांना मजबुरी ने घ्यावे लागल्यास शेतकऱ्यांना सुद्धा तो जबरदस्ती विकावे लागते. सदर लिंकिंग खताच्या किमती पेक्षाही जास्त किमतीची सुद्धा असल्याने परिणामी खतांचा तुटवडा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माण तर झालाच आहे परंतु शेतकरी दोन्ही बाजूने हवालदिल झाला आहे व शेतकऱ्यांचे एक प्रकारचे हे शोषण होत असल्याचे आजाद समाज पार्टीने म्हटले आहे.
सदर कंपन्या काही विशिष्ट डीलर मार्फतीनेच खताचा पुरवठा करत असल्याने हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सुद्धा आरोप पक्षाने केला आहे.
मागण्या :
- जिल्ह्यातील प्रत्येक भागात तात्काळ खत पुरवठा करण्यासाठी शासनाने उचित पाऊले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- खत कंपन्यांची लिंकिंगची मनमानी तातडीने बंद करावी. आणि अनावश्यक लिंकिंग करणाऱ्या कंपन्यावर फौजदारी गुन्हे (FIR) नोंद करावेत.
- विशिष्ट डीलर मार्फत खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यावर तात्काळ कारवाई करावी.
- सर्व रासायनिक खते शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विक्रेत्यांच्या गोडाउन पर्यंत पोहचविण्याचे निर्देश कंपन्याना देण्यात यावेत.
वरील मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी उचित कार्यवाही करावी अन्यथा आजाद समाज पार्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
यावेळी आजाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सोनाशी लभाने, प्रकाश बन्सोड, सतीश दुर्गमवार, धनराज दामले, सुरेंद्र वासनिक इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.

