बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
22 लाख 88900 रुपये किमतीचे चंदन जप्त
पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीने आयशर गाडीमध्ये एक कप्पा करून त्यात पांढऱ्या चंदनाची तस्करी करणाऱ्या आयशर गाडीला पाठलाग करून मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या सतर्कते मुळे पकडण्यात आले

मलकापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच चंदन तस्करीची कारवाई करण्यात मलकापूर शहर पोलिसांना यश आले असून ही ऐतिहासिक कारवाई म्हटली जाईल.लाखो रुपयांचे चंदन या कारवाईत जप्त केले. यातून तस्करीच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक बुलढाणा रोड वरील वानखेडे पेट्रोल पंपा जवळ नाकाबंदी दरम्यान दिनांक ७ जून सोमवार रोजी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान आयशर गाडी क्रमांक एम एच 16 ए इ 9616 गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता बोदवड रस्त्याने पळ काढला.पाठलाग करून गाडीला थांबवले.सुरुवातीला चालकाने उडवा उडविचे उत्तरे दिली. दरम्यान गाडीची झडती घेतली असता आयशर गाडीच्या ट्रॉली मध्ये आत कप्पा दिसून आला त्या कप्प्यात पांढऱ्या रंगाच्या युरिया थैल्यांमध्ये पांढरे चंदन असल्याचा संशय आला. करिता
पोलिसांनी आयशर गाडीला ताब्यात घेतले व मलकापूर शहर पो स्टे येथे आणले.त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पांढरे चंदन असल्याची पुष्टी केली व पंचनामा केला.

दरम्यान चालकाने सदर चंदन बीड येथून बुलढाणा, मलकापूर,बऱ्हाणपूर मार्गे मध्यप्रदेशात घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईत 8 क्विन्टल 26 किलो असा मोठ्याप्रमाणात पांढऱ्या चंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेले हे चंदन 22 लाख 88900 रुपयाचे असून एकूण मुद्देमाल 38 लाख 88हजार 900 रुपयांचा जप्त करण्यात आला.प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत यापेक्षाही अधिक असू शकते. तस्करी करून आंतरराज्यीय बाजारात चंदनाची विक्री करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

