विदर्भ विभाग प्रतिनिधी: -युसूफ पठाण
आ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात, पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत, असा बिनबुडाचा आरोप करतांना संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी आणि अन्य दिंड्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी केलेला आरोप संविधानिक मूल्यांचा अवमान करणारा आहेच, ही संविधानिक मूल्ये संतांच्या विचारांवरच आधारित असल्याने त्यांचाही अवमान करणारी आहे.
महाराष्ट्र अंनिस आ. मनिषा कायंदे यांच्या विधान परिषदेत मत व्यक्त करण्याचा अधिकाराचा आदर करून त्यांनी हे वक्तव्य करताना या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे हे नमूद करीत आहे आणि त्यांच्या वरील वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे. त्यांनी केलेल्या भाषणातील विसंगती जनतेच्या निदर्शनास आणून देत आहोत. या दिंडीत सामील होणारे लोक देवाला न मानणारे, नास्तिक संघटनांचे आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. ते नास्तिक आहेत याचे कोणतेही पुरावे नाहीत.
संविधान दिंडीत महा. अंनिसचे कार्यकर्ते सामील असतात. या संघटनेत सर्व धर्मांचे, पंथांचे, विविध विचारांना मानणारे लोक आहेत. संविधानिक मूल्यांना आदर्श मानणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनतेच्या देव-धर्म-श्रद्धा विषयक मूलभूत अधिकारांचा आदर करते. अशा कार्यकर्त्यांना किंवा नास्तिकांना वारीत सामील होण्यास बंदी असल्याचा काही परंपरागत नियम किंवा फतवा नाही. संतांनी आपल्या काळात प्रस्थापित असलेल्या जातीप्रथेविरोधात, अन्य अनिष्ट प्रथांविरोधात जाऊन समतेची, बंधुभावाची, विवेकाची वैश्विक मूल्ये लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. तीच मूल्ये वारकरी संप्रदायाने अनुसरली. महा. अंनिस सुद्धा संतांच्या याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहे आणि संविधान दिंडीत सामील होत आहे. आमचे कार्यकर्ते ‘देव मानू नका’ अशी मांडणी कधीही करीत नाहीत आणि या दिंडी मार्फत देखील करीत नाहीत. वारीत तसे काही केल्याचा कोणताही पुरावा आ. मनिषा कायंदे यांनी दिलेला नाही.
या दिंडीत सामील असणारे अनेक ह.भ.प. कीर्तनकार, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे चोपदार, विविध विवेकवादी संस्थांचे जबाबदार पदाधिकारी, पर्यावरणाची काळजी घ्या म्हणून सांगणारे पर्यावरणवादी, संतांच्या विचारांवर निष्ठा असलेले वारकरी हे यांना कोणत्या अंगाने अर्बन नक्षली वाटत आहेत? इतिहास साक्ष देत आहे की संतांनी आपल्या काळात जातीप्रथेविरोधात तसेच अन्य अनिष्ट प्रथंविरोधात जाऊन प्रस्थापितांविरोधात बंड केले.
त्यांनी समतेची, बंधुभावाची, विवेकाची वैश्विक मूल्ये लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते संत ठरले. तीच मूल्ये संविधानाने स्वीकारलेली आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. हे सांगितले तर ते सांगणार्यास थेट अर्बन नक्षली म्हणून हिणवताना या संतांच्या मूल्यांनाच आपण अर्बन नक्षलींच्या रांगेत आणून बसवत आहोत हे मा. मनीषा कायंदे यांच्या लक्षात कसे येत नाही याचे आश्चर्य वाटते.
त्याच वेळेस सांविधानिक मूल्ये पाळणे म्हणजे अर्बन नक्षलवाद अशी मांडणी करत आहेत. हा संविधानाचा अवमान आहे. समता, बंधुता, विवेक ही या आधी धर्माला मान्य नसलेली, संतांनी रुजवलेली आणि नंतर संविधानात आलेली मूल्ये लोकांना समजावून सांगितली तर त्यास मा. कायंदे बुद्धिभेद करणे असे म्हणतात. ते कशाच्या आधारावर? उलट त्याच लोकांचा बुद्धिभेद करून संतविचारांपासून लोकांना दूर ढकलत आहेत असे म्हणावे लागेल.
मा. मनीषा कायंदे म्हणतात लवकरच येऊ घातलेले विशेष जनसुरक्षा विधेयक हे अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे. हे सभागृहात जाहीर करून या काळ्या विधेयकाचा छुपा उद्देश त्यांनी उघड केला आहे. या विधेयकाच्या रूपाने संविधानाच्या रक्षणासाठी लढणार्या कार्यकर्त्यांच्या आणि संघटनांच्या समोर कोणते ताट वाढून ठेवले आहे.याची कल्पना येते.
या विधेयकास म्हणूनच महा. अंनिस विरोध करत आहे.
संजय बनसोडे माधव बावगेराज्य कार्याध्यक्ष. राज्य अध्यक्षगजेंद्र सुरकार, राज्य प्रधान सचिवमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

