सीता नदीत वाहून गेलेला दुचाकीस्वार पाण्यातून बाहेर निघाला
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे.
गडचिरोली : पावसाळ्यात (Rain) पुलाच्या पाण्यावरुन जात असताना वाहून जाण्याच्या घटना सातत्याने समोर येतात. राज्यातील विविध जिल्ह्यात नद्यांना (River) पूर आल्यानंतर अतिधाडस करुन दुचाकी, चारचाकी वाहनासह पाण्यातून जीवघेणा प्रवास करणारे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. अनकेदा या पुलावरुन धोकादायक प्रवास केला जातो. आता, असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करत वाहन पाण्यात टाकल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या (Gadchiroli) कुरखेडा तालुक्यातील सती नदी पूलावर घडली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून तेथे उपस्थित कामगार आणि पोलिसांना त्या वाहून जाणाऱ्या इसमास वाचवण्यात यश मिळाले. अजय बाळकृष्ण रामटेके, (वय 40 वर्षे), रा. श्रीराम नगर, कुरखेडा असे त्या इसमाचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. सती नदीच्या पूलावरुनही पाणी वाहत असताना अजय रामटेके या दुचाकीस्वाराने धाडस करत वाहन पाण्यात टाकले. मात्र, काही क्षणातच ते वाहून गेले.
त्यावेळी पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस जवान आणि कामगारांनी दोरीच्या सहाय्याने वाहून जाणाऱ्या अजय रामटेके यांना वाचवले. कामगारांनी नदीत उतरुन त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
100 गावांचा संपर्क तुटण्याची भीती
चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी पुलाला लागल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पर्लकोटा नदी ही छत्तीसगडमधून भामरागडकडे वाहते. त्यामुळे पूलावर पाणी चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नदीवर नवीन पूलाचे बांधकाम करण्यात करण्यात येत असले तरी ते अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने पूलावर पाणी आल्यास तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटू शकतो. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील 6 प्रमुख जिल्हा मार्ग पुरामुळे बंद होते. आज सकाळी सर्व मार्ग सुरू झाले आहेत.


