भाकपाचा प्रशासनाला इशारा – “जमीन मोजणी व कोणत्याही हालचाली सुरू करू नयेत”
एटापल्ली, १ जुलै २०२५ | प्रतिनिधी
एटापल्ली तालुक्यातील मोडस्के–नैनवाडी परिसरात युनिव्हर्सल खाजगी कंपनीकडून प्रस्तावित खाण प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) ने याला तीव्र विरोध नोंदवला आहे. भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार आणि शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार यांनी तहसीलदार एटापल्ली यांना भेटून यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, जंगल आणि जलस्रोतांची नासधूस, तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांवर आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात कोणतीही जमीन मोजणी किंवा खाणविषयक हालचाल सुरू करू नये, असा ठाम इशारा भाकपाने प्रशासनाला दिला आहे.
“जिल्ह्यातील बहुसंख्य भागात आजही आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत. अशा वेळी भांडवलशाही नफ्याच्या लोभात नैसर्गिक संपत्तीचा विध्वंस करणे अक्षम्य आहे,” असे कॉ. मोतकुरवार यांनी म्हटले.
भाकपाने हेही स्पष्ट केले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही भागात सुरू होणाऱ्या खाण प्रकल्पांचा भाकपा तीव्र विरोध करतो. केवळ मोडस्के–नैनवाडी नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात अशा खाणींमुळे विस्थापन, पर्यावरणाचा नाश आणि सामाजिक विषमता वाढत आहे, आणि भाकपा हे सहन करणार नाही.
भाकपाने यासंदर्भात प्रशासनास इशारा दिला आहे की, “जर या हालचाली त्वरित थांबवण्यात आल्या नाहीत, तर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. हा संघर्ष केवळ पर्यावरणाच्या रक्षणासाठी नसून, तो सामाजिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे.”


