राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे.
यवतमाळ तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध उत्खननाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रश्नावर विधानभवनात आवाज उठवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या सह मनसेच्या शिष्टमंडळाने आज यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने तालुक्यातील विविध भागांतील अवैध उत्खनन, महसूल विभागाची उदासीनता, आणि यापूर्वी केलेल्या तक्रारींचा तपशीलवार आढावा आमदारांसमोर मांडला.
मनसेच्या शिष्टमंडळाने यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देत अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या. परिस्थिती बदलली नाही म्हणून महसूल मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली. मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे मॉडेलच्या धर्तीवर ड्रोन सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पण प्रत्यक्षात महसूल विभागाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर, मनसेच्या शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून, हा गंभीर विषय विधानभवनात मांडण्याची विनंती केली. आमदार मांगुळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, लवकरच हा मुद्दा विधानभवनात मांडण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध उत्खननामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास, शेतजमिनींचे नुकसान आणि पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे , शहर अध्यक्ष अमित बदनोरे ,प्रथमेश पाटील, सोनू गुप्ता, ऋषिकेश हळदे, यश शृंगारे, साहिल जतकर, दर्शन नानवरे, हिमांशु कुडमथे, तृषाल चोंडके यांच्या सह मनसे पदाधिकारी उपस्थित होते
मनसेच्या या पुढाकारामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात या विषयावर मोठे राजकीय व सामाजिक आंदोलन होण्याची चिन्हे आहेत.

