कंधार तालुक्यात घरकुल न बांधता बोगस कारभार उघड्यावर….
संबंधित लाभधारक बील काढण्यासाठी हैराण
कंधार प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर कागणे
तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलचे कामे चालु असून घरकुल न बांधता पंचायत समितीचे कंत्राटी, शाखा अभियंता माया घेवून बीले काढीत असल्याने शासनास लाखो रुपयास चुना लावण्याचे काम चालु असून ‘ आओ चोरो, बांधो भारा , आधा हमारा आधा तुम्हारा’ या म्हणी प्रमाणे तालुक्यात जोरदार बील काढण्याचा घाट सुरु असून या प्रकरणाची तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न संबंधित लाभधारकात निर्माण झाला आहे.
याबाबत असे की, तालुक्यात विविध योजनेअंतर्गत प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात घरकुलांचे काम सुरु आहे. परंतु घरकुल न बांधता आणि जुन्याच घरावर बीले उचलण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तालुक्यात सात ते आठ कंत्राटी शाखा अभियंता नेमण्यात आले आहेत. ते कायमस्वरुपी अभियंता नसल्याने आमचे काहीही वाकडे होणार नाही, या भूमिकेत शाखा अभियंता वावरत असून बील काढून घ्या, आणि ठरलेली माया द्या, असा प्रकार सध्या कंधार पंचायत समितीमार्फत चालु आहे.ग्रामसेवकासह संबंधित वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रोखपाल या सर्वांना ठरलेली माया दिल्याशिवाय कोणतेही देयके अदा केली जात नाहीत.
तालुक्यात हजारो घरकुल विविध योजनेतून मंजूर झाले आहेत. परंतु घरकुले न बांधता आणि जुनेच घरकुल दाखवून देयके काढण्याचा प्रकार सध्या तालुक्यात सुरु आहे. याविषयी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी काही जणांना विचारले असता गटविकास अधिकारी, प्रकल्प संचालक यांना धरुन व त्यांना माया देवून देयके काढण्याचा प्रकार सुरु असल्याचे काही संबंधित कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
शासनाच्यावतीने कंधार तालुक्यात हजारो घरकुल मंजूर झाले आहेत. ज्यांना घरकुल नाही, अशांनाही घरकुल मंजूर आहेत आणि ज्यांना मोठ्या माड्या आहेत,अशांनाही घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचे काम सुरु असून संबंधित कंत्राटी , शाखा अभियंता मात्र बोगस देयके घेवून देवून आपली झोळी भरण्याचे काम करीत असून मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या प्रकरणी लक्ष देवून मोठ्या प्रमाणात बोकाळलेला गैरप्रकार त्वरीत बंद करुन झालेल्या भ्रष्टाचाराची त्वरीत चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी,अशी मागणी जनतेतून जोर धरीत आहे.


