येवती शिवारातील अमर देवतळे यांची तहसीलदारांना नुकसान भरपाईसाठी मागणी…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव तालुक्यातील मोजा येवती शिवारात राहणारे शेतकरी अमर देवतळे यांचे अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दिनांक 26 जून 2025 रोजी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या नाल्याला अचानक पूर आल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरले. या पाण्यामुळे शेतातील कापूस व सोयाबीन या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याशिवाय देवतळे यांच्या शेतात साठवलेले 30 बॅग खत, इंजिन ऑईल व सुमारे 10 नग पीव्हीसी पाईप वाहून गेले. या सर्व गोष्टींचे आर्थिक मूल्य हजारोंमध्ये असल्याने शेतकऱ्यावर मोठा आर्थिक भार पडला आहे. या घटनेमुळे अमर देवतळे यांचे शेतसंकल्प पूर्णतः उध्वस्त झाले असून त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी तहसील कार्यालय, राळेगाव येथे भेट देऊन अधिकृत निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शासन व प्रशासनाने त्वरित दखल घेऊन अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

