रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा कॉ तेजस गुज्जलवार
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
एटापल्ली (ता. २६ जून २०२५) — एटापल्ली नगर पंचायतने सध्या काढलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ई-निविदेमध्ये अतिशय जाचक अटी घालून नव्या व लहान ठेकेदारांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) केला आहे. या संदर्भात भाकपचे शहर सचिव कॉ. तेजेश गुज्जलवार यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हा उपआयुक्त (नगर प्रशासन) आणि उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्याकडे निवेदन सादर केले.
भाकपच्या म्हणण्यानुसार, या निविदेतील अटी इतक्या कठोर आहेत की यामध्ये केवळ काही ठराविक मोठे ठेकेदारच सहभागी होऊ शकतात, तर नवीन व छोटे ठेकेदारांना संधीच मिळत नाही. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणतीही खुली स्पर्धा उरत नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये याच पद्धतीने जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. तेव्हा अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी या विरोधात तक्रारी केल्या आणि त्यानंतर नगर पंचायतने प्रशासकीय कारण देत ती निविदा रद्द केली होती. मात्र आता पुन्हा त्याच प्रकारच्या अटी घालून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने, हे जाणीवपूर्वक केलेले स्पर्धा संपवण्याचे कारस्थान असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे, असा आरोप भाकपने केला आहे.
कॉ. तेजेश गुज्जलवार यांनी प्रशासनास स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ही निविदा त्वरित रद्द करण्यात आली नाही, तर भाकपच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या निविदेतील अटी कोणत्या शासन निर्णयावर आधारित आहेत? त्यामागचा उद्देश काय आहे? याचा खुलासा प्रशासनाने तातडीने करावा, अन्यथा ही प्रक्रिया संदेहास्पद ठरेल आणि स्थानिक जनतेचा विश्वास उडेल, असे भाकपने नमूद केले आहे.

