लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
“लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महायुती सरकारने अनेक आश्वासनांची खैरात केली होती, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून ‘क्या हुवा तेरा वादा’ अशा आसयाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा आमदार माजी कॅबिनेट मंत्री संजय बानसोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर शेतकर्यांना अनेक प्रलोभने दाखवून दिशाभूल करण्यात आली होती, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना रुपये 15000 देण्यात येतील, महाराष्ट्र राज्यातील 45000 गावात पानंद रस्ते बांधून दिले जातील, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये देणार, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात येईल, एक रुपयांमध्ये शेतकरी पिक विमा देण्यात येईल, संजय गांधी निराधार दिव्यांग इंदिरा गांधी या योजनेतील पेन्शन धारकांना रुपये 2100 महिना देण्यात येईल ,अन्नदाता बनेल ऊर्जादाता शेतीला 24 तास वीज देण्यात येईल, शेतीमालाला हमीभाव देण्यात येईल, बियाण्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यात येतील, मराठवाडा वाटर प्रिडसाठी केंद्राकडून तात्काळ मान्यता घेण्यात येईल, महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जल योजना राबवून प्रत्येक नागरिकाला घरकुल योजना मंजूर करण्यात येईल, यासह अन्य आश्वासनांची खैरात महायुती सरकारने दिली होती.
दिलेल्या आश्वासनांची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, श्रीमंत सोनाळे पाटील, तालुका प्रमुख प्रशांत मोरे, जिल्हा समन्वयक प्रकाश हैभतपुरे,तालुका संघटक बालाजी पुरी,उप तालुका प्रमुख महेश फुले उप तालुका प्रमुख रवी पाटील , अरुण बिरादार ,ओम रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

