पुणे विभाग – सचिन दगडे
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत मिळालेल्या प्रचंड यशानंतर पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी ढमढेरे यांनी अजित पवार यांच्याशी दूध दर व त्यावरील अनुदानाविषयी चर्चा केली.
दुधाला मिळणारे दर हे टिकून राहायला पाहिजेत तसेच दुधाला मिळणारे अनुदान हे असेच चालू ठेवून दुधाला योग्य व स्थिर भाव मिळण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघटनेच्या दूध संघांच्या प्रतिनिधींचीही (दि.२८) या विषयावर बैठक झाल्याचे स्वप्निल ढमढेरे यांनी चर्चेदरम्यान सांगितले. बैठकीत गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
गोकुळ, वारणा व राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफचे दूध ३० रुपये लिटरने खरेदी केले जाणार आहे.
पुणे जिल्हा दूध संघामध्येही योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. २८ रुपये सरकारने ठरवलेला दूध दर आहे, अशी माहिती स्वप्निल ढमढेरे यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील ऊस तोडणीचा प्रश्न, तालुक्यातील उसाचे खूप मोठे असलेले क्षेत्र यावर चर्चा करून सर्व अडचणीतून मार्ग काढून मदत करणार असल्याचे याप्रसंगी अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार हे नेहमीच पुणे जिल्हा दूध संघाला मदत मिळवून देत असल्याचे स्वप्निल ढमढेरे यांनी सांगितले.


