वर्धा प्रतिनिधी: – इम्रान खान
वर्धा:-जिल्ह्यात खासगी सावकारीचाअक्षरशः आगडोंब उसळल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील हजारो कुटुंबे खासगी सावकारांच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागत आहेत. मात्र, सावकारांच्या दहशतीमुळे कुणी तक्रार देण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यात १४२ परवानाधारक सावकारांची नोंद निबंधक कार्यालयाकडे आहे.सावकाराने शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच कर्ज द्यावे लागते. मात्र, शासनाने ठरवून दिलेला नियम धाब्यावर बसवून थेट महिन्याला शेकडा दहा ते ६० रुपये एवढे व्याज आकारतात. नोंदणीकृत सावकारांवर सहायक निबंधकांची नजर राहते. मात्र, नोंदणी न करता कर्ज दिले जात असेल तर, त्याला अवैध सावकारी संबोधले जाते. या प्रकरणात कर्ज देणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, शहरासह जिल्ह्यात अद्याप एकाही अवैध सावकारावर पोलिस कारवाई झालेली दिसून येत नाही. किंवा तशी तक्रारही कुणी देण्यास पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.
सावकारांचा ऐषोआराम !• बहुतांश सावकारांचा पोटापाण्याचा असा कोणताही व्यवसाय नाही, अनेक सावकारांचे शिवारात शेतही नाही, पण बहुतेक सगळ्या सावकारांचे राहणीमान मात्र राजेशाही थाटाचे आहे. आलिशान बंगला, वातानुकूलित गाडी, सोन्याच्या माळा, सोन्याच्या अंगठ्या असा बहुतेक सावकारांचा रुबाब असतो. दिमतीला पुन्हा उडाणटप्पू त तरुण असतातच. काही खासगी सावकारांची त्या त्या भागातील पोलिस ठाण्यात उठ बस असल्याने कुणी तक्रार करण्याचेही धाडस करीत नाहीत. हे तितकेच खरे. संघटित सावकारी वाढली !• वसुलीसाठी अनेक सावकारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्याचे दिसत आहे. या टोळ्या एकमेकांच्या वसुलीसाठी एकमेकांना मदत करताना दिसतात. या संघटित शक्तीच्या जोरावर जिल्ह्यातील सावकार दिवसेंदिवस मुजोर बनताना दिसत आहेत. संघटित सावकारी हळूहळू संघटित गुन्हेगारीकडे वाटचाल करताना दिसत आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या खासगी सावकारांचा हात दिसून येतो. त्यामुळे संघटित गुन्हेगारी कायद्याचा वापर करून खासगी सावकारी मोडीत काढण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित असलेल्या लोकांचा खासगी सावकारीत मोठा वाटा आहे. सावकारांच्या ‘मॅन आणि मसल’ पावरमुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या नादाला लागत नाही. पण, गोरगरीब आणि गरजू लोक अगदी हमखासपणे सावकारांच्या पाशात अडकू लागले आहेत.


