पुणे विभाग प्रतिनिधी: सचिन दगडे पुणे:- पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दहापैकी आठ जागा महायुतीने जिंकल्या, तर महाविकास आघाडीला अवघी एक जागा मिळाली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झालेला आहे. या दहापैकी पाच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, असा सरळ सामना होता.त्यामध्ये सर्व पाचही जागा अजित पवार यांच्या गटाने जिंकल्याने अजित पवारांनी आपणच पुणे जिल्ह्याचे दादा आहोत, हे दाखवून दिले आहे. शरद पवारांच्या पक्षाचा एकही उमेदवार त्यांच्या ‘होम ग्राउंड’वर विजय मिळवू शकला नाही.शरद पवार यांच्याविरुद्ध थेट सामना नसलेल्या भोर मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार संग्राम थोपटे यांना पराभूत करून दादांचे शिलेदार शंकर मांडेकर हे विजय झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने जिल्ह्यात सहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु, हे सहाही उमेदवार पराभूत झाले. आंबेगावमध्ये देवदत्त निकम, जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर, बारामतीमध्ये युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये रमेश थोरात, शिरूरमध्ये अशोक पवार यांना पराभवाचा दणका बसला आहे.सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या विजयाचा जल्लोषअजित पवार आणि शरद पवार या नेत्यांमधील पुणे जिल्ह्यातील त्यांच्या ‘होम ग्राउंड’वरील राजकीय युद्धामध्ये अजित पवारांची फार मोठी सरशी झाली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व आपणच करणार, हे अजित पवारांनी या विजयामुळे दाखवून दिले आहे. अजित पवारांनी जिल्ह्यामध्ये नऊ उमेदवार उभे केले होते, त्यामधले सहा उमेदवार विजयी झाले आहेत. खेडमध्ये दिलीप मोहिते, पुरंदरमध्ये संभाजी झेंडे, तर जुन्नरमध्ये अतुल बेनके या दादांच्या शिलेदारांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे.खेड-आळंदीमध्ये दिलीप मोहिते पाटील आणि जुन्नरमध्ये अतुल बेनके या महायुतीतील अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना, तर महाविकास आघाडीतील शिरूर-हवेलीमध्ये अशोक पवार (शरद पवार गट), भोरमध्ये संग्राम थोपटे, पुरंदर-हवेलीमध्ये संजय जगताप या दोन काँग्रेसच्या आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर महायुतीतील आंबेगाव-शिरूरमधून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मावळ सुनील शेळके, बारामती अजित पवार, इंदापूर दत्तात्रय भरणे या अजित पवार गटाच्या, तर दौंडमधून भाजपच्या राहुल कुल या विद्यमान आमदारांनी विजय मिळविला आहे.गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या निवडणुकीत पुन्हा लढत देणारे पुरंदर-हवेलीचे शिवसेनेचे उमेदवार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि जुन्नरमधील अपक्ष शरद सोनवणे यांनी पुन्हा विजय मिळवत विधानसभेत पाऊल टाकले आहे. शिवतारे यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर पुरंदर-हवेलीत अत्यंत मोठ्या प्रमाणावर संपर्क वाढवत जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आणि विजय खेचून आणला आहे. खेड-आळंदीमधून उध्दव ठाकरे शिवसेनेचे बाबाजी काळे, भोरमधून शंकर मांडेकर आणि शिरूर-हवेलीतून ज्ञानेश्वर कटके या अजित पवार गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत प्रथमच विधानसभेत पाऊल ठेवले आहे.जयंत पाटील यांचा अवघ्या १३ हजारांनी विजयजिल्ह्यातील सर्वांत धक्कादायक पराभव हा शिरूर-हवेलीमध्ये अशोक पवार यांचा झाला आहे. सुरुवातीला पवारांसाठी अतिशय सोपी वाटणारी ही लढत विजयी उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना वाढलेल्या प्रतिसादामुळे मोठी रंगतदार झाली आणि पवार यांना पराभव पत्करावा लागला. बारामतीत झालेली अजित पवार विरुध्द त्यांचे पुतणे युगेंद्र यांच्यातील लढत फार घासून होईल, अशी अटकळ सर्वांनी बांधली होती. परंतु, तसे काही झाले नाही.अजित पवार यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी आरामात विजय मिळविल्याचे चित्र दिसले. लोकसभेला शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार, या सूत्राप्रमाणे बारामतीकरांनी मतदान केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील महायुतीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर महाविकास आघाडीची शरद पवार यांच्याकडे होती. त्यातही अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर मात केली आहे. दहापैकी महायुतीच्या आठ जागा निवडून आल्या आहेत, तर महाविकास आघाडीला अवघी एक जागा मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

