वर्धा प्रतिनिधी : इम्रान खान
अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. पीडिता ओरडत राहिली, मात्र दोघांसोबत असलेल्यानेही तिला वाचविले नाही. याची माहिती पीडितेने घरच्यांना दिली. तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींना १६ रोजी न्यायालयात नेले असता १९ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.समीर शेख, अदनान ऊर्फ अहू शेखआणि सूरज चौधरी, सर्व रा. वर्धा, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता १७ वर्षांची आहे. ती दहाव्या वर्गात नापास झाल्याने ती आजीच्या फळविक्रीच्या हातगाडीवर मदतीला जात होती. त्याच परिसरात ऑटोचालक समीर शेख हा देखील त्याच्या इतर मित्रांसोबत बसत असे. पीडितेचे आणि ऑटोचालक समीर शेख यांची ओळख झाली. दोघांमध्येप्रेम निर्माण झाले. १५ रोजी रात्रीच्या सुमारास समीर शेख हा पीडितेला दुचाकीवर बसवून चितोडा रस्त्यावरील एका निर्जनस्थळी नेले तेथे पूर्वीपासूनच आरोपी अदनान शेख आणि सूरज चौधरी हे दोघेही हजर होते. आधी समीरने व नंतर अदनान या दोघांनी आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला. पीडिता वाचवा, वाचवा म्हणून ओरडत राहिली; पण दोघांसोबत असलेला सूरज वाचविण्यासाठी गेला नाही.

पीडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. पीडितेने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. १६ रोजी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ही कारवाई प्रशांत वंजारी, श्रावण पवार, विजय पंचटीके, नरेंद्र कांबळे, शिवदास डोईफोडे, शैलेश चाफलेकर, नंदकिशोर धुर्वे, राजेश राठोड यांनी केली.

