वर्धा विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात कारंजात विविध सामाजिक संघटनांचा एल्गार
कारंजा ( घा. ) स्थानिक विविध सामाजिक संघटना व वीज ग्राहकांकडून कारंजा येथील विद्युत वितरण कंपनीला निवेदन देऊन स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या विरोधात काळया फिती लाऊन शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महावितरण कंपनी कडून स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावले जाणार नाही असे जाहीर केले होते. परंतु विधानसभा निवडणूक संपताच स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे सुरू झाले आहे.
वीज वितरण कंपनीच्या कारंजा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्या कार्यवाहीचा विविध सामाजिक संघटनांनी निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
स्मार्ट प्रीपेड मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली जात आहे. या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेली आहेत वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत. त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भुर्दंड हा वीज ग्राहकालाच भरावा लागणार ! हे मात्र सत्य आहे.
वीज ग्राहकांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना स्मार्ट प्रीपेड मीटर का बसविल्या जात आहे ? हा प्रश्न वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहक कल्याण किंवा लोककल्याणकारी भूमिका विचारात न घेता भविष्यात वीज वितरण कंपनीद्वारे ग्राहकांच्या खिशातूनच ही रक्कम वसूल केल्या जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे.
वीज ग्राहकांचे हित लक्षात न घेता खाजगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत असल्याचे सामाजिक संघटनांनी व वीज ग्राहकांनी म्हटले आहे. मीटर निवडण्याचे स्वातंत्र्य वीज ग्राहकांना असावे. आज जरी मीटरची किँमत ग्राहकाकडून वसूल केल्या जात नसली तरी
भविष्यात मीटर ची किंमत वीज दरामध्ये वाढ करूनच याची आर्थिक तरतूद वीज ग्राहकांच्या बिलातूनच करणार. आम्हाला स्मार्ट प्रीपेड मीटर अमान्य असून
ग्राहकांच्या परवानगीशिवाय सदर मीटर लावू नयेत असे म्हटले आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर परवडणे शक्य नाही. स्मार्ट मीटरबाबत सतर्क राहून नागरिकांनी विरोध करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे.

सध्याच्या व्यवस्थेनुसार वीजबिल भरण्यासाठी आठ ते दहा दिवस मुदत मिळते, ती व्यवस्था प्रीपेड मीटरमध्ये मिळणार नाही. रिचार्ज संपल्यास आपोआप वीजपुरवठा खंडित होईल. रिचार्ज करण्यासाठी पैसे नसणाऱ्यां गरीबांना वीजपुरवठा होऊ शकणार नाही. त्यातून भविष्यात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काळया फिती लावून निवेदन देतेवेळी कारंजा येथील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व वीज ग्राहक उपस्थित होते. कारंजा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उप अभियंता श्री. राजूरकर यांनी निवेदन स्वीकारले.
*प्रतिक्रिया*
रोगापेक्षा इलाज भयंकर
“वीजचोरी रोखण्याच्या उद्देशाने महावितरणने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. मात्र हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे. सर्वसामान्यांकडून विरोध होत असूनही खासगी कंपन्यांच्या हितासाठी वीज वितरण कंपनी स्मार्ट मीटर का लावत आहेत ? पूर्वी मीटर मार्केट मधून खरेदी करण्याचा वीज ग्राहकांना पर्याय उपलब्ध होता. आता तो पर्याय मात्र नवीन धोरणात नाही. ही मनमानी आम्हाला मान्य नाही.
शासनाने खाजगी कंपनीच्या हितापेक्षा लोककल्याणकारी धोरण अवलंबवावे. “
– विनोद चाफले
सचिव, कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती

