माहिती संकलन विभाग
जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस साजरा करण्यात येतो. महिलांच्या मानसिक आरोग्याकडे तसेही खूप दुर्लक्ष होते. दरवर्षी जगातील एकूण महिलां लोकसंख्येच्या 23 टक्के महिला या मानसिक आजार अनुभवतात. नॅशनल मीडिया रिसर्च या जगविख्यात कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय महिला 87% तर अमेरिकन महिला 53% तणावपूर्ण आयुष्य जगतात. 27% महिला केवळ हार्मोनल चेंजसमुळे मानसिक तणावात जगतात. 33% महिलांना ओव्हर थिंकिंग मुळे मानसिक ताण जाणवतो. 56 % महिलांना आपण मानसिक आजारी आहोत असं वाटतच नाही. तर कुटुंबीय देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असं अहवाल सांगतो. ही आकडेवारी देऊन त्या पुढे म्हणाल्या की, वर्ष 2021 ला नॅशनल क्राईम ब्युरो अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये एक लाख 33 हजार 64 आत्महत्या झाल्या. त्यात 23000महिला आणि 13000 विद्यार्थिनी होत्या हे वास्तव खरंच सर्वांना धक्का बसेल असे आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा जिल्ह्याने वारसा स्त्रीशक्तीचा या अभियानांतर्गत वसा साऊ जिजाऊंचा ध्यास समता सन्मानाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. स्त्रियांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. विजेता विटणकर यांनी अत्यंत गांभीर्याने हा विषय हाताळला. त्या आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या की, घरातील स्त्री प्रथम कुटुंबाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप अधिक काळजी घेते. त्याचवेळी ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. हल्ली गृहिणींसोबतच नोकरी करणाऱ्या महिला देखील खूप डिप्रेशन मध्ये जायला लागल्या आहेत. काही महिलांना तर सर्वच बाबतीत सर्वच ठिकाणी परफेक्ट असायला पाहिजे असं वाटतं. याला वैद्यकीय भाषेत सुपर वुमन सिंड्रोम म्हणतात. नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये आपण मुलांकडे व घराकडे लक्ष देऊ शकत नाही याची अपराधी भावना सतत जाणवते. सोशल मीडियाचा अतिवापरामुळे इमर्जिंग प्रॉब्लेम सध्या सर्वत्र जाणवतो आहे. वास्तवापेक्षा आभासी जगात अधिक रहमान होताना दिसते. साडी, सण,जेवण, प्रवास, तसेच नातं या सर्वच गोष्टी सोशल मीडियावर टाकणं आणि त्याला किती लाईक मिळाले हे सतत जाणून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे अट्टाहासामुळे मानसिक ताण येतो. एकमेकांना वेळ देण्यापेक्षा आपण सतत सोशल मीडियाला वेळ देतो. आपल्या समाजातील काही रूढी परंपरा अशा आहेत की, ज्यामुळे महिलांना त्यात सातत्याने गुंतवून ठेवल्या जात. त्याचा देखील ताण महिलांना येऊन मानसिक आजारी होण्यासाठी कारक ठरतात. मानसिक आजारांची लक्षणे सांगताना त्या म्हणाल्या की, सतत दुःख अथवा निराशा जाणवणे, स्वतःच्या ऊर्जेच्या पातळी आणि भुकेच्या क्षमतेत लक्षणीय बदल होणे, किरकोळ गोष्टीचाही खूप राग येणे सतत चिडचिड करणे, नकारात्मक विचारांचे सतत डोक्यात थैमान सुरू असणे, कुठल्याच कामाबाबत उत्साह न वाटणे, अगदी टोकाचे अर्थात आत्महत्या सारखे विचार सतत मनात येणे, चाळीशी नंतर होणाऱ्या हार्मोन्स बदलाचा ताण असह्य होणे, मुलांच्या, कुटुंबाच्या भविष्याबाबत अति चिंता अथवा भीती असणे. ही सर्व अधिक प्रमाणात होत असेल तर मानसिक स्वास्थ्य बरोबर नसल्याचं लक्षण आहे.यावर आपण वेळीच उपाययोजना केली पाहिजे. सर्वप्रथम स्वतःची इतरांसोबत अजिबात तुलना करू नका. स्वतःसाठी वेळ द्या चांगल्या सवयी मैत्रिणी पुस्तक गाणं डान्स स्वतःच्या आनंदासाठी करा. दुसऱ्याच्या स्तुतीचं सर्टिफिकेट मिळण्याची आशा करू नका. कारण अपेक्षाभंगासारखं दुसरं दुःख नाही. सुपर लेडी, आयडियल मॉम असं काही नसतं. आपले वैचारिक मित्रपरिवार वाढवा, नियर अँड डियर फ्रेंड आपल्या यादीत असू द्या. मनातल्या काही गोष्टी सांगायच्या असेल, भरभरून रडायचं असेल तरीदेखील तसा खांदा शोधा. ही व्यक्ती मात्र खात्रीची आणि विश्वासनीय असायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर सोडून केवळ घर आणि मुलं ह्यात स्वतःला पूर्णपणे गुंतवू नका, सर्व गोष्टी माझ्याच मनाप्रमाणे असला पाहिजे असा अट्टाहास अजिबात करत बसू नका. शरीराच्या आजाराकडे आपण ज्या पद्धतीने लक्ष देतो त्याच पद्धतीने मनाकडेही लक्ष द्या. मन आणि शरीर याचा जवळचा संबंध आहे. सर्वांकडे सर्व असत नाही हे आधी आपण मान्य करायला हवं. कौन है जिसमे कमी नही आसमा के पास भी तो जमीन है इतका सुंदर वक्तव्य करून त्यांनी स्वतःच महत्व आणि महिलांचं मानसिक आरोग्य पटवून दिलं. विशेष म्हणजे या ऑनलाइन कार्यक्रमाला शंभर ची संख्या पूर्ण झाल्यामुळे इतर लोकांना जॉईन देखील करून घेता आलं नाही यावरून स्त्रिया आणि त्यांचे मानसिक आरोग्य हा विषय किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येतं. या आभासी कार्यक्रमाला दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर, वाशिम, भंडारा, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, या जिल्ह्यातील व्यक्ती सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा दापूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंजुषा देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शंकर श्रीरामे यांनी करून दिला. निखिल जवादे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, माननीय प्रकाश कांबळे, सारिका डेहनकर, कविता राठोड कविता लोहट, द्वारका ताई इमडवार, सुनील ढाले, प्रितेश म्हैसकर, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले तसेच माधुरी झाडे यांचे सहकार्य लाभले.


