पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत राजु महादेव मारणे (वय २४, रा.दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत त्याचे वडिल महादेव विनायक मारणे (वय ५९, रा. दत्तनगर, रामनगर, वसाहत, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी यश गोपिनाथ साष्टे (वय २१, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वारजे माळवाडीतील दत्तनगर येथील मोकळ्या प्लॉटवर मंगळवारी रात्री अकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजु मारणे व यश साष्टे हे जवळ जवळ राहतात. राजु आणि यश यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात घेऊन यश व त्याच्या साथीदारांनी राजु याला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने त्याच्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने व त्याच्या एका साथीदाराने ”आमच्या नादाला लागायचे नाही, नाहीतर एकेकाला खल्लास करुन टाकतो,” असे म्हणून दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करीत आहेत.


