“शालेय जीवनात कठीण वाटणाऱ्या गणित विषयाची प्राथमिक स्तरापासूनच गोडी लागावी यासाठी कृती आधारित आनंददायी पद्धतीने अध्यापन करून मुलांची जिज्ञासा वाढवावी.” समन्वयक निखील तुकदेव यांचे प्रतिपादन.
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ गणेश राठोड
उमरखेड: दिनांक २१ डिसेंबर रोजी भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी संस्कार पोदार लर्न स्कुल येथे ‘राष्ट्रीय गणित दिनाचे’ आयोजन करण्यात आले. त्यानिमीत्य विविध गणितीय क्रियांनी मोठ्या उत्साहात गणितोत्सव साजरा करण्यात आला.
त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विलास चिरडे माजी गणित विभागप्रमुख गो. सी. गांवडे महाविद्यालय, प्रशासकीय अधिकारी आतिश दिघेवार, समन्वयक निखिल तुकदेव, ज्योती सुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थ्यांनी गणित विषयाशी संबंधित विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यात नाविन्यपूर्ण नाटक, व नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. गौरी रायेवार हिने कविता तर स्पृहा दिघेवार व प्रणव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच शाळेच्या ग्रंथालयात गणित प्रदर्शनाचे आयोजन केले. ज्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गणितीय मॉडेल, पोस्टर आणि शैक्षणिक साहित्य हे मुख्य आकर्षण ठरले. ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांची गणिताची क्षमता दाखवण्याची उत्तम संधी मिळाली.
शालेय जीवनात कठीण वाटणाऱ्या गणित विषयाची प्राथमिक स्तरापासूनच गोडी लागावी यासाठी कृती आधारित आनंददायी पद्धतीने अध्यापन करून मुलांची जिज्ञासा वाढवावी.” असे प्रतिपादन निखील तुकदेव यांनी केले. रामानुजन यांच्या गणितातील अद्भुत शोधांची व योगदानाची माहिती धनंजय दुबे यांनी विद्यार्थ्यांना दिली. डॉ. विलास चिरडे त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची महती, त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोग आणि गणिताच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्ग यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या करचलवार, पाहुण्यांचा परिचय जिनी देवासिया तर आभार प्रदर्शन तृप्ती अग्रवाल यांनी केले.शाळेचे संचालक मंडळाच्या मार्गदर्शन व प्रेरणेने कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेचे प्रिन्सिपल ,प्रशासकीय अधिकारी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य करून उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


