गणेश राठोड जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : -रेल्वे मार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाची अवजड वाहनांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना उमरखेड हदगाव रोडवरीलफॉरेस्ट नाका ते बिटरगाव (खुर्द )नवी आबादी पर्यंतच्या रस्त्याची अगदी चाळण झालेली असताना धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत .मागील एक वर्षापासून कामाचा कुठल्याही प्रकारे थांगपत्ता नसला तरीही रस्त्याचे काम प्रगतीपथावर म्हणून रस्त्याच्या कडेला फलक झळकविले जात असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्यजनक संताप व्यक्त होत आहे. फॉरेस्ट नाका ते बिटरगाव खुर्द नवी आबादी या रस्त्यावर जागोजाग मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अगदी चाळण झाली आहे .सदर रस्ता हा फॉरेस्ट नाका ते वेअर हाऊस पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असल्याचे समजते .तर उर्वरित रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर आहे .परंतु मागील एक वर्षापासून या रस्त्याचे साधे डागडूगीचे काम करण्यात आले नाही .आता या खड्डेयुक्त रस्त्यावरून रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या मुरुमाची वाहतूक करणारे हायवा टिप्पर अशी अवजड वाहने रात्रंदिवस धावत आहेत .त्यामुळे या पावडर रस्त्यावरून धावणारे वाहनामुळे धुळीचे लोळ उठत असल्याने आजूबाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत .सदर रस्त्याच्या कडेला रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे फलक लावण्यात आले असल्याने नागरिकांमध्ये संतापजनक आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे .


