पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : ”देशात सर्वाधिक बिबटप्रवण क्षेत्र जुन्नर उपवनविभागात आहे. आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात अनेक गावे हॉटस्पॉट आहेत. सरासरी एका गावात चार ते पाच बिबट्यांचा वावर असून, या तीन तालुक्यांत ४०० ते ५०० बिबटे असल्याचा अंदाज आहे.बिबट्यांची वाढती संख्या, हल्ले व उपद्रव रोखण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाईल. नसबंदीचा हा देशातील पहिला प्रयोग आहे,” असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. ११) बिबट शीघ्र कृती दल भूमीपूजन सोहळा व मेंढपाळांना तंबू व सौर दिवे वाटप सातपुते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक उपवन संरक्षक स्मिता राजहंस, मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, अवसरी बुद्रुकच्या सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, दिलीप लोखंडे, आदर्शगाव गावडेवाडीचे उपसरपंच एकनाथ गावडे, देवराम गावडे, ऋषिकेश गावडे, मच्छिंद्र गावडे, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, आदर्शगाव भागडीचे सरपंच गोपाळ गवारी, वळतीचे सरपंच आनंद वाव्हळ, जवळेचे सरपंच उत्तम शिंदे उपस्थित होते.सातपुते म्हणाले, ”राज्यात प्रथमच जुन्नर उपवनसंरक्षण विभागात मेंढपाळांना तंबू व सौर दिवे वाटप केले जात आहेत. त्यामुळे मेंढपाळांच्या कुटुंबांचा बिबट्यापासून बचाव होण्यास मदत होते. एकांतात असलेल्या घरांना अनुदानातून सौर कुंपण देत आहोत. सध्या ऊसतोडणी सुरू आहे. लहान मुले व शेतात काम करणाऱ्या महिला व मजुरांनी अधिक काळजी घ्यावी.”या वेळी शांताराम हिंगे पाटील, राजहंस यांची भाषणे झाली. सोनल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत मडके यांनी आभार मानले. गावडेवाडी, पिंपरखेड, न्हावरा, नगदवाडी, आळे येथे बिबट शीघ्र कृती दल इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. दहा कर्मचारी, एक वाहन, २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे. बिबट्याने हल्ला केल्याचे समजतात शीघ्र दलातील कर्मचाऱ्यांची मदत तातडीने घटनास्थळी उपलब्ध होणार आहे.


