प्रतिनिधी खर्डी विभाग प्रकाश धाबे
३० हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोकडून रंगेहात पकडले
ठाणे :
खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा ग्राम सन्मान पॅनलचे सदस्य मोसिन शेख यांना अखेर पदावरून हटविण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत घरपट्टी आकारणीसंदर्भात शेख यांनी पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रार दाखल होताच अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी शेख यांच्यावर सापळा रचला. त्यानुसार ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ते रंगेहात पकडले गेले.
या प्रकरणानंतर ग्रामपंचायतीतर्फे शेख यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. मात्र हा राजीनामा फक्त दिखावा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ज्या दिवशी लाच स्वीकारताना ते पकडले गेले, त्याच दिवशी त्यांनी राजीनामा सादर करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे न करता नंतर दाखल केलेला राजीनामा मंजूर केला होता.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत कोकण विभागीय आयुक्त यांनी शेख यांना पदावरून दूर करण्याचा आदेश जारी केला. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराला चाप बसणार असून गावात पारदर्शक कारभाराची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

