ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
मराठवाडा विभाग प्रमुख शुभम उत्तरवार
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आज याबाबतचा आदेश निर्गमित केला. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, खाजगी शिकवणी व प्रशिक्षण केंद्र २७ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प तुडुंब भरलेले असून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी गाठली असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

