” – माहिती अधिकार समितीकडून हिंगणघाटच्या नायब तहसीलदारांवर कारवाईची मागणी.
“दंडाधिकारी की दलाली?” हिंगणगाटात ७५ वर्षीय वृद्धाच्या मृत्यूने खळबळ, नायब तहसीलदारांवर गंभीर आरोप!
हिंगणघाट, वर्धा: शेतजमिनीच्या बांधाच्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धाच्या मृत्यूने हिंगणघाट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी, प्रशासकीय यंत्रणेनेच आरोपींना संरक्षण दिल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीसमित्र समितीने (MAPSPS) केला आहे. विशेष म्हणजे, या मृत्यूसाठी समितीने थेट नायब तहसीलदार एम. एस. भलावी यांना जबाबदार धरले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
छोटी आर्वी, ता. हिंगणघाट येथील रहिवासी लक्ष्मीकांत दुगे (वय ७५) यांचा त्यांच्या शेजारच्या वासुदेव आणि सुरेश आदमाने या पिता-पुत्रासोबत शेतजमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. वारंवार होणाऱ्या अर्वाच्य भाषेचा वापर, अपमान, धमक्या आणि मानसिक खच्चीकरण यामुळे पीडित लक्ष्मीकांत दुर्गे पूर्णपणे खचले होते. या प्रकरणी नायब तहसीलदार यांच्यासमोर दोन्ही पक्षांना बोलावण्यात आले होते. २३ जानेवारी २०२५ रोजी नायब तहसीलदार यांनी आदेश पारित केला होता, त्यात आदमाने पिता-पुत्रांनी त्यांचा बांध खोदून वाद मिटवण्याचे तोंडी आश्वासन दिले असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले होते.
परंतु, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. उलटपक्षी, आदमाने पिता-पुत्रांनी अरेरावीची भाषा वापरत दुर्गे यांना धमकावले. या सततच्या मानसिक छळामुळे आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे अखेर २० जुलै २०२५ रोजी लक्ष्मीकांत दुर्गे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या दुर्दैवी घटनेनंतर, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीसमित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, विदर्भ विभागीय महिला संघटक सौ. ज्योत्स्ना करवाडे, तसेच प्रतिनिधी महेश पेन्दोर आणि जितेंद्र खोडे यांनी नायब तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी, नायब तहसीलदारांची भूमिका पक्षपाती असल्याचा आणि ते विरोधी पक्षासोबत “साटेलोटे” करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकंदरीत झालेल्या चर्चेत केलेला आरोप सत्य असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असेही मत ठामपणे मांडण्यात आले आहे.
सौ. ज्योत्स्ना करवाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “ज्या अधिकाऱ्यांनी न्याय द्यायचा आहे, तेच या गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार आणि गुन्हेगार ठरतात. त्यांच्या दुर्लक्षामुळेच या वृद्धाचा जीव गेला. “या घटनेनंतर संबंधित अधिकारी ‘साधे पत्रकारांशी देखील नीट वागत आणि बोलत नाहीत, तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल?’ असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्य मागणी
समितीने 01 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा प्रशासनाने गंभीरपणे विचार करणे आवश्यक असतांना देखील, विचार झाला नाही, एवढेच काय तर, संबंधित पत्राला आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देखील दिलेले नाही, समितीने पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले सर्व धोके संबंधित नायब तहसीलदार यांच्या गलथान, एककल्ली आणि पक्षपाती भूमिकेमुळे प्रत्यक्ष घडलेले आहेत, पीडित कुटुंबियांची जीवित, वित्त, मानसिक आणि शारिरीक हानी झालेलीच आहे, त्या कुटुंबाला त्यांचा घरातला वृद्ध व्यक्ती गमवावा लागला आहे, लक्ष्मीकांत दुर्गे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक प्रशासकीय अधिकारी, आणि विरोधी पक्षातील वासुदेव आदमाने आणि सुरेश आदमाने या पिता-पुत्रावर सदोष मनुष्यवधाचा (Section 304) गुन्हा दाखल करण्यात यावा.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या, गलथानपणा, पक्षपाती आणि एककल्ली अश्या नायब तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आलेली आहे.
या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

