“जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो.
जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो.
जो रुढिच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसर्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसर्याच्या हातचे बाहूले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.
जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसर्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवीत नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रितीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश: जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.”
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’
(संदर्भ- ‘मुक्ती कोन पथे?’ हे ३१मे १९३६ मधील बाबासाहेबांचे गाजलेले भाषण).
©️®️
दिपक धुंदाळे दिप्स 🖊️
बुलढाणा 📖
8668680173


