कंधार प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी कंधार येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा या पक्षाचे संस्थापक व माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या २८ व २९ ऑगष्ट रोजी नांदेड जिल्हा तसेच कंधार व लोहा तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस होऊन शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावातील पशूधन नष्ट झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढे होऊनही आठ दिवस होत आले तरी प्रशासन किंवा सरकारकडून या शेतक-यांना कोणतीच तातडीची मदत मिळाली नाही याचा माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे ते म्हणाले.
सरकारकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी मुबलक प्रमाणात असतो आणि तो तातडीने वितरीत करून शेतक -यांना धीर देणे गरजेचे असते. परंतू गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत असल्याचे सांगून ते म्हणाले गेल्या ८० वर्षात एवढा पाऊस झाला नव्हता परंतू अवध्या ३६ तासांत ३०० मिली पाऊस तालुक्यात पडला असल्याने अतोनात नुकसान झाले.
राज्य शासनाकडे निधीची कमतरता असेल तर केंद्र सरकारकडून त्वरीत निधी मंजूर करून घेण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार मदतही देत असते परंतू सद्या राज्यशासन या प्रकरणी उदासिन दिसून येत आहे.
आपल्या जिल्हयात राजसभेचे दोन खासदार असून सत्ताधारी आहेत.
तसेच जिल्हयातील आमदारही सत्ताधारी पक्षाचे असूनही तातडीची मदत मिळत नाही हे या सरकारचे व लोकप्रतिनिधीचे दूर्दैव आहे याचाही आम्ही निषेध करतो. आमच्या ह्या मोर्चा व्दारे शेतकर्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, नदी, ओढ्याकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीसाठी प्रतिएकर एक लाख रुपये द्यावे, घराची पडझड, वाहून गेलेली जनावरे याची नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा
चालू वर्षातील पिक विमा तातडीने द्यावा अशा मागण्या मांडण्यात आल्याची माहीती देऊन हा मोर्चा ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोटबाजार येथून निघून शिवाजी चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकेल असे त्यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेस दत्ता पवार, सुभाष मोरे, अशोक सोनवळे, शिवराज धोंडगे, शफीउल्ला बेग उपस्थित होते.


