महाक्रांती न्यूज नेटवर्क ( सतीश.वी.पाटील)
चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागूचरी गावात स्मारक-त्याकाळी सात वर्षे काढलेल्या हालअपेष्टांमुळेमुळे आज चरीच्या गावकऱ्यांना अच्छे दिन आले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. या लढ्यामुळे ‘”कसेल त्याची जमीन” हे धोरण अमलात आलं आणि “कुळकायदा” तयार करण्यात आला.’ शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ लढ्याचे स्मारक चरी या गावात उभारण्यात आलेले आहे. या संपाची आठवण म्हणून शेतकऱ्यांचं अवजार असलेले टिकाऊ याचा वापर स्मारकस्तंभातील ज्योतीमध्ये केलेला आहे.

असे अनेक टिकाऊ मिळून ही ज्योत तयार केलेली आहे. या स्मारकस्तंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्या हस्ते करण्यात आले. झुंजार नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ असा सात वर्षे अभूतपूर्व संप केला. प्रामुख्याने या संपामुळे कुळकायदा निर्माण झाला आणि स्वातंत्र्यानंतर कसेल त्याची जमीन हे नैसर्गिक तत्त्व प्रस्थापित झाले. त्यामुळे खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून समस्त शेतकरीवर्ग मुक्त झाला. या गौरवशाली संपातील लढवय्या शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी त्या संपाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे स्मारक उभारले गेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत महायज्ञ आणि महाप्रसाद-चरी गावाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर येथील बौद्ध वाडी येथे महायज्ञ आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य पूर्व काळात जातीभेदभाव असला तरी अलिबाग तालुक्यात जातिभेदभाव हा त्याकाळीही नव्हता.

चरी गावात अठरा पगड जातीचे लोक एकोप्याने नांदत होते. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चरी येथे आल्याने गावकऱ्यांचे भाग्यच होते. त्यानिमित्त केलेल्या महापूजेनंतर महभोजन सर्वांनी एकत्रित केले. त्यामुळे चरीचा शेतकऱ्यांचा हा संप एकतेचे प्रतीक म्हणूनही ऐतिहासिक ठरला आहे.

