समनक जनता पार्टीचे राज्यव्यापी आंदोलन
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद : ( दि. 21 ऑगस्ट 2025)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र पाण्याचा हाहाकार सुरू आहे. अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. नदी व नाल्या काठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. तसेच बहुतांश पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक जण वाहून गेल्या असून जीवितहानी झाली आहे. या संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ आर्थिक मदत जमा करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन समनक जनता पार्टीच्या वतीने दि. 21 ऑगस्ट रोजी………… यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदनानुसार, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात असलेले पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे.
या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी नदी व नाल्यांच्या प्रवाहात, माणसे वाहून गेली, जनावरेही वाहून गेली, शेतातील स्पिंकलर पाईप व शेती अवजारे सुद्धा वाहून गेली आहेत. अनेकांचे घरे सुद्धा जमीनदोस्त झाली आहेत. हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे.
समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण , राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. अनिल राठोड, प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड यांच्या मार्गदर्शनात
गुरुवारी संपूर्ण राज्यभरातून समनक जनता पार्टीच्या वतीने गाव, तालुका व जिल्हा स्तरावरून राज्यव्यापी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास समनक जनता पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या माध्यमातून समनक जनता पार्टीने केलेल्या मागण्यांमध्ये,
संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. ज्या ज्या ठिकाणी पुरामुळे माणसे वाहून गेलेत अशा कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. ज्या नागरिकांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलेत त्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावी. ज्यांचे घर पुरामध्ये नष्ट झाले असेल त्यांना तातडीने घर बांधून द्यावे. संबंधित तहसीलदारांनी त्या कुटुंबांच्या पुनर्वसनाची तातडीने व्यवस्था करावी. ज्या शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेलीत, तसेच शेतीपयोगी साहित्य वाहून गेले, अशा शेतकऱ्यांना पंचनाम्याचा ससेमिरा न लावता सरपंच, पोलीस पाटील यांच्या दाखल्यावर तात्काळ प्रभावाने आर्थिक मदत करावी.
नदी व ओढ्या काठच्या खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून त्या शेतकऱ्याला ती जमीन पुन्हा तयार करण्यासाठी हेक्टरी 5 लाख रुपयांचे अनुदान द्यावे. शेतकऱ्यांप्रमाणेच शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यांप्रमाणेच तातडीची आर्थिक मदत द्यावी.
काही ठिकाणी मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांनी तळ्यात बीज टाकले होते, मात्र, अतिवृष्टीमुळे ते वाहून गेले. अशा मच्छीमार संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत द्यावी. शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करताना “ई पीक” पाहणीची सक्ती करू नये.
आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना सुमित राठोड जिल्हा आध्यक्ष पश्चिम यवतमाळ विलास आडे तालुकाध्यक्ष आदींसह समनक जनता पार्टीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहून निवेदन दिले

