आजाद समाज पार्टीची पी.आय. चव्हाण कडे आमदार सहित, दोषींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी….
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली (प्रतिनिधी) – शासकीय शाळा या शिक्षण, धर्मनिरपेक्षता आणि अराजकीयतेचे प्रतीक असतानाही, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राजकीय नेत्यांनी थेट प्रचार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यासंदर्भात आजाद समाज पार्टीने गडचिरोली पोलीस स्टेशन चे निरीक्षक विनोद चव्हाण यांना निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन यावर आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची मागणी केली.
तक्रारीनुसार घडलेले प्रकार
दिनांक ३० जुलै २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय शाळांमध्ये विधानसभा सदस्य (आमदार ) डॉ. मिलिंद नरोटे (भाजप) यांनी विद्यार्थ्यांना पक्षाच्या नावाचे व चिन्ह असलेली वह्या व साहित्य वाटप केले. यापूर्वीही काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, मिलिंद खोब्रागडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते राहुल डांगे यांच्याकडून अशाच प्रकारचे वितरण झाले असल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच, रामपुरी शाळेत विश्व हिंदू परिषद या संघटनेने विशिष्ट धार्मिक विचारधारा पेरणारे शिबीर घेतल्याची माहितीही देण्यात आली आहे.
कायदेशीर उल्लंघन
निवेदनात म्हटले आहे की, अशा कृती RTE Act 2009, शालेय व्यवस्थापन नियम 1984, Representation of the People Act 1951, तसेच शालेय विभागाच्या आदेशांचे उल्लंघन आहेत.
अशा कृतींमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यावर मतनिर्मितीसाठी अनुचित दबाव निर्माण होतो, जो कायद्याने दंडनीय आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, २८(१) व २१(अ) चा भंग होतो.
मद्रास उच्च न्यायालयासह इतर अनेक न्यायालयांनी शालेय साहित्यात राजकीय नेत्यांचे फोटो किंवा प्रचार साहित्य वितरित करणे चुकीचे ठरवले आहे, असेही आजाद समाज पार्टीने नमूद केले आहे. याबाबत प्रशासनाची कुठलीही परवानगी सुद्धा घेण्यात आली नव्हती अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.

मागणी:-
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अशी ठाम मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मिडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, तालुकाध्यक्ष प्रेम मडावी आणि सहसचिव मोसम मेश्राम यांनी केली आहे.

