पुण्यात खळबळ बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा.
पुणे विभाग : सचिन दगडे.
पुणे : पुण्यात बी टी कवडे रस्ता परिसरात बसेरा कॉलनीत वालचंद ओसवाल यांचं सोन्याचं दुकान आहे. वालचंद दुकानात बसले होते, तर मुलगा तुषार चहा आणण्यासाठी जवळच्या चौकात गेला होता. ही संधी साधून रात्री सव्वा नऊ वाजता दुचाकीवर तीन तरुण तोंडाला बांधून आले, दोघेजण दुकानात घुसले, लगेच शटर अर्धे बंद केले.
दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून डोळ्यांवर स्प्रे मारला. हातातील कोयता पाठीत मारून सोन लुटले. त्याचवेळी दुकानदार जोरात ओरडला त्यामुळे शेजारचे दुकानदार व ग्राहक पळत आले. शटर बंद पाहून ‘चोर चोर’ म्हणून ओरडले. यामुळे चोर घाबरले आणि हातात बसले तेवढे सोनं घेऊन बाहेर पळाले.
हातात बंदूक व कोयता असल्याने रस्त्यावर उभे असलेल्या लोक घाबरले. त्यामुळे चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनेची तात्काळ माहिती ओसवाल यांनी मुंढवा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली

याप्रकरणी वालचंद ओसवाल यांच्या तक्रारीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. रहदारीच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

