राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा राळेगावात संतप्त एल्गार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव, 25 जुलै
शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद आणि बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तात्काळ कारवाई करून राजीनामा घेण्यात यावा, अशी तीव्र मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने राळेगाव येथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे केली.
कोकाटे यांनी शेतकऱ्यांना “भिकारी”, “विमा भरत नाहीत, लग्न समारंभ करतात” असे म्हटले. एवढ्यावरच न थांबता कृषी मंत्रालयाला “ओसाड गावाची पाटीलकी” म्हणत त्यांनी संपूर्ण कृषी विभागाचीही थट्टा केली. विधान भवनात चालू अधिवेशनात मोबाइलवर ‘रमी’ खेळताना त्यांचा व्हिडिओ समोर आल्याने, त्यांच्या गंभीरपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“शेतकऱ्यांचे रक्त, घाम, अश्रू यांची जाण नसणाऱ्या मंत्र्याला कृषीखात्याची धुरा चालवायचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल”, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.
उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दिलेल्या या निवेदनावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके, महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई काकडे, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, तालुका सरचिटणीस गौतम तागडे, उपाध्यक्ष प्रवीण काकडे, सूर्यभान लांजेवार, संजय भोरे, दिगंबर वडुळकर, सुभाष कोहळे, नारायणराव धानोरकर, पुरुषोत्तम बेंबारे, नागोराव कुमरे, गजानन धोटे, किशोर चांदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते. बेजबाबदार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कोकाटे यांच्यावरील नाराजीचा भडका आता वाढू लागला असून, जनतेच्या रोषाचा सामना टाळायचा असेल तर सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

