सोलापूर जिल्हा प्रतिनीधी: – हेमंत सरवदे
सोलापूर, दि. २४ जुलै – सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी- पाकणी रोडजवळील एमआयडीसी येथील परिसरात दुपारी साधारण तीन वाजता अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी झालेल्या भीषण अपघातात कोळेगाव येथील प्रसिद्ध हॉटेल सुगरणचे मालक रवींद्र सुभाष वाघमोडे (वय ५१) आणि त्यांचे चालक अनिल दत्तात्रय वाघचवरे (वय ३५, रा. भांबेवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओमनी कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ओमनीमधील दोघेही गंभीर जखमी झाले.
दोघांनाही तातडीने सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आयशर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कोळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोळेगावच्या समाजजीवनातील एक कष्टाळू उद्योजक हरपला…
रवींद्र वाघमोडे हे कोळेगावमधील उद्यमशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी उभारलेले हॉटेल सुगरण हे मोहोळ तालुक्यात नावाजले गेले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार व गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

