पावसामुळे उपचारात विलंब, वन्यजीवही त्रस्त
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी :- सुनील वर्मा
दिनाक- २२ जुलै २०२५ तालुक्यातल्या पहूर गावात एका दुर्दैवी घटनेत सर्पदंशामुळे ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सिंधुताई शंकर मुंढे असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या अंथरुणात शिरलेल्या भारतीय कोब्रा या विषारी सापाच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे उपचार मिळण्यात विलंब झाला आणि जीव गमवावा लागल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे. घटना रात्रीच्या सुमारास घडली. सिंधुताई मुंढे या घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपल्या होत्या.
पावसामुळे थंड हवामानात आडोसा शोधणाऱ्या सापाने त्यांच्या अंथरुणात प्रवेश केला. झोपेत असताना त्यांना भारतीय कोब्रा या अत्यंत विषारी नागाने दंश केला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मेहकर येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पावसामुळे नदीला पूर आला होता आणि रस्ते पूर्ण बंद झाले होते. या विलंबामुळे त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत आणि रस्त्यातच त्यांचे निधन झाले.
——- सावधगिरीचा इशारा
सर्पमित्रांकडून पावसाळ्यात साप घरात घुसण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. या पार्श्वभूमीवर सर्पमित्र प्रा. विनय कुलकर्णी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपू नये. दरवाज्यांच्या फटी, बीळ, इतर साप जाण्याजोग्या जागा बंद ठेवाव्यात. मच्छरदानीचा वापर ही एक सुरक्षित उपाययोजना ठरू शकते,असे त्यांनी सांगितले. — पावसामुळे वन्यजीवही त्रस्त सिंधुबाईच्या मृत्यूची घटना एकीकडे, तर दुसरीकडे पावसामुळे केवळ माणसांनाच नाही तर वन्यजीवांनाही हैराणीचा सामना करावा लागत आहे.
पावसामुळे निवारा शोधणाऱ्या अनेक प्राणी-पक्ष्यांची स्थितीही हलाखीची झाली आहे.प्राणीमित्र प्रा. विनय कुलकर्णी यांनी रात्रीच्या सुमारास पावसात अडकलेल्या आणि जखमी अवस्थेतील Rock Eagle Owl (श्रृंगी घुबड), कोकिळेचे एक पिल्लू, तसेच दोन साप – एक नाग व एक दिवड यांचे यशस्वीपणे रेस्क्यू केले. निसर्गातील या जीवांना सावरून पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्याने त्यांच्या जीवनात नवे प्राण संचारले. आपत्कालीन व्यवस्थेचा पुनर्विचार गरजेचा याघटनांवरून स्पष्ट होते की, ग्रामीण भागातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अद्यापही अनेक अडथळ्यांनी ग्रस्तआहे.
विशेषतः पावसाळ्यात पूर, खचलेले रस्ते, वाहतुकीचा अभाव यामुळे वेळेत उपचार मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत मोबाईल मेडिकल युनिट, जलद प्रतिसाद पथक अशा उपाययोजनांचा विचार शासनाने करणे आवश्यक ठरत आहे. _ संपूर्ण गावात हळहळ सिंधुताई मुंढे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला असून, नागरिकांनी या पावसाळी काळात अधिक सतर्क राहावे, हीच वेळेची गरज असल्याचे सर्पमित्रांकडूनही सांगण्यात येत आहे.

