प्रवाशांची धावपळ; चालकांना सूचना देण्याची मागणी
बुलढाणा/लोणार:- सुनील वर्मा
राज्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचणारी म्हणून एसटी (लालपरी) ची ओळख आहे. याचा लाभ राज्यातील करोडो प्रवासी घेतात. मात्र, ग्रामीण भागात अनेक एसटी या फलकांविना धावत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. फलकाविना एसटी धावत असल्याने ही एसटी बस कुठे जाते, अशी चौकशी सुशिक्षित प्रवाशांनाही अडाणीप्रमाणे विचारावे लागत आहे. एसटी महामंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील मुख्य बसस्थानकात हा प्रकार होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील विविध गावांना धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसेस या गावाच्या नावाच्या फलकाशिवाय धावतात. यामुळे बसस्थानकासह ग्रामीण भागातील प्रवाशांना धावपळ करावी लागते. ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवासासाठी एसटी बस हेच एक साधन आहे. याच बसेसच्या माध्यमातून ते वाहतूक करतात. लहान-मोठ्या गावांसह तालुक्याच्या ठिकाणी धावणारे बसेसही गावाच्या नावाचे फलक न लावताच धावतात. यामुळे, प्रवाशांना एसटी कुठे चालली हेच कळत नाही. तेव्हा प्रवाशांना धावपळ करत चौकशी करावी लागते.

फलकाशिवाय एसटी फलाटावर उभारली तर सुशिक्षित व अशिक्षित प्रवाशांना चौकशी करावीच लागते. आपल्याच गावाला समोरून बस गेली तरी ती कुठे गेली कळत नाही. ग्रामीण व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक एसटीने फलक लावल्यास प्रवाशांची धावपळ वाचेल. यासाठी प्रशासनाकडून चालकांना सक्त सूचना देणे गरजेचे आहे.
फलकाशिवाय एसटी दिसली की प्रवाशांची धावपळ होते. फलक नसलेली बस समोरूनच आपल्या गावाला गेली तरी कळत नाही. प्रवाशांची होणारी धावपळ वाचण्यासाठी प्रत्येक बसला फलक सक्ती व्हावी.
- संघपाल पनाड,
वंचित नेते
“फलकाशिवाय एसटीचा महिला प्रवाशांना जास्त त्रास होतो. सोबत लहान मुले असतात. अशावेळी एसटीची चौकशीसाठी फलाटावरून नियंत्रकांकडे जावे लागते. ती थांबण्यासाठी फलक सक्ती करावी.”
— सौ.श्वेता सिंघी
अध्यक्ष,जैन सहेली सोशल ग्रुप लोणार
_*फलक नसल्याने एसटी कुठून आली अन् कुठे जात आहे, कळत नसल्याने प्रवाशांची तारांबळ
फलक नसल्याने सुशिक्षित लोकांनाही अशिक्षितप्रमाणे विचारावे लागते
एस.टी. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची होतेय प्रवाशांतून मागणी*_

