लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
- आमदार अमित विलासराव देशमुख यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) गुरुवार १० जुलै २५ :
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रुग्णालयाच्या विस्तारासाठी रेल्वे विभागाची जागा हस्तांतरीत करण्यासाठी,
वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी
अधिवेशनादरम्यान गुरुवार दि. १० जुलै २५ रोजी विधानसभेत हा विषय उपस्थित
करताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर येथील
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लगत असलेली रेल्वे
विभागाची जागा देण्याचा आणि त्या बदल्यात रेल्वे विभागाला इतरत्र जागा
देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब
यांनी घेतला होता, अद्याप या जागेची अदलाबदल झाली नसल्यामुळे सदरील
महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या विस्तारात, आरोग्याच्या सुविधा
उभारण्यात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी स्थापन
झालेले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी आता
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी झाली आहे, वेगवेगळ्या विभागाची
रुग्णालय येथे उभारली गेली आहेत, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स बांधण्यात
येत आहेत, बाह्य रुग्णविभागाचे बांधकाम सुरू होणार आहे, या
महाविद्यालयाचा भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी, लगत असलेली रेल्वे विभागाची जागा या
महाविद्यालयास व रुग्णालयास देण्याचा व त्या बदल्यात राज्य शासनाची इतर
ठिकाणची जागा रेल्वे विभागाला देण्याचा निर्णय घेतला होता, पुढे रेल्वे
विभागाला या जागेच्या बदल्यात जागा न मिळाल्यामुळे, रेल्वे विभागाकडून
महाविद्यालयास जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही, लातूरचे रेल्वे
स्टेशन आता शहराबाहेर गेलेले असल्यामुळे महाविद्यालय लगतची जागा सध्या
रिकामीच आहे, रेल्वे विभागाला पर्याय जागा मिळाल्यास ही जागा लगेच
हस्तांतरीत होणार आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी राज्याचे
मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, लातूर जिल्ह्यातील सर्वच
आमदार, खासदार त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि रेल्वे विभागाचे
वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून रेल्वे विभागाची जागा
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास उपलब्ध करून द्यावी, अशी
मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री
हसन मुश्रीफ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अशी बैठक आयोजित
करून निर्णय घेण्याबाबत यावेळी अनुकूलता दर्शवली आहे.
धर्मादाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यात होणाऱ्या
दिरंगाईबाबतचा मुद्दाही यावेळी आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित
केला, धर्मादाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर योग्य वेळेत उपचार
होण्यासाठी शासनाने नियम केले आहेत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी
करण्यात यावी, असे निर्देश यावेळी सभापती राहुल नार्वेकर यांनी दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण
देताना, धर्मादाय रुग्णालयातील उपचाराच्या संदर्भाने लक्ष ठेवण्यासाठी व
सुधारणा घडवून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन केली असून यापुढे
कुठल्याही रुग्णाच्या उपचारात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेतली जाईल
असे सांगितले.
उद्योग आणि कारखान्यात होणाऱ्या अपघातात दरवर्षी मोठी मनुष्यहानी होत
आहे, ती टाळण्यासाठी शासनाने फायर फायटिंग आणि इतर सुरक्षेच्या
यंत्रणेबाबत दरवर्षी कन्सेंट टू ऑपरेट ही सिस्टीम सुरू करावी, अशी
मागणीही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत बोलताना
केली आहे.

