हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे
राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, मानबेट (चौके) येथे मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेत हरवलेल्या मुलांना मातीशी पुन्हा जोडण्यासाठी एक आगळा-वेगळा चिखल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा शिक्षक डी. आर. नलवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही आनंदाचा क्षण ठरला.
मुख्याध्यापक एस. एम. खडके यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी चिखलामध्ये रस्सीखेच, फुगडी, लंगडी, फुटबॉल यांसारखे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. संगीताच्या तालावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून बालपणाची आठवण ताजी केली.

मातीमध्ये खेळताना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी शाळेच्या वतीने चिखलात हळद आणि गोमूत्र मिसळून सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली होती.विद्यार्थ्यांच्या खेळासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्र चिखलाची मैदाने तयार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी चिखलात लोळत आणि खेळत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. विद्यार्थी-शिक्षक संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी आम्हीही खेळात सहभागी झालो, असे शिक्षक एन. एन. पाटील यांनी सांगितले. तसेच, मातीमध्ये खेळल्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते व शारीरिक विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.“मोबाईल-लॅपटॉपच्या आभासी दुनियेतून मुलांनी बाहेर यावे, आणि खऱ्या अर्थाने पावसाळ्याचा आनंद घ्यावा, यासाठीच दरवर्षी पावसाळ्यात चिखल महोत्सवाचे आयोजन केले जाते,” असे मुख्याध्यापक खडके यांनी सांगितले.या चिखल महोत्सवाला माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चिखलात खेळण्याचा हा अनोखा अनुभव सर्वांच्या लक्षात राहणारा ठरला.


