लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
नाट्यगृह आणि शादीखाना बांधकामासाठी अपेक्षित निधीबाबत पालकमंत्री महोदयांची भेट.!
लातूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामे यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.
१) लातूर जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा लवकरात लवकर व्हावा
२) सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नवीन व आधुनिक एम.आर.आय व सिटीस्कॅन मशीन उपलब्ध व्हावी. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्ण सेवा सदन व टीबी रुग्णालय उभारण्यात यावे.
३) लातूर येथील नाट्यगृह बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक 26 कोटी 11 लक्ष रुपयांचा निधी मिळावा
४) लातूर शहरातील शादीखान्याच्या उर्वरित बांधकामास निधी मिळावा
लातूर शहरासाठी 2013 साली जिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली होती. 100 खाटांच्या या रुग्णालयासाठी 120 कोटी रुपये निधी मंजूर होऊन तो वर्ग झाला होता. मात्र जागी अभावी लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न पडलेला होता. जिल्हा रुग्णालयास जागा उपलब्ध व्हावी आणि ती आरोग्य विभागाकडे वर्ग व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी लातूरमध्ये आंदोलने केली होती. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनीही पाठपुरावा केला होता. परिणामी कृषी महाविद्यालयाची जागा आता जिल्हा रुग्णालयासाठी हस्तांतरित केली आहे. तरी सध्या उपलब्ध असलेल्या निधीतून जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा लवकरात लवकर करावा अशी मागणी केली.
लातूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अदयावत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी एमआरआय व सिटीस्कॅन मशीन आहे. मात्र ही यंत्रणा 13 वर्षांपूर्वीची असल्याने ती सातत्याने बंद पडते. परिणामी याचा रुग्णांना काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तात्काळ नवीन व आधुनिक एमआरआय व सिटीस्कॅन मशीन उपलब्ध होणे आवश्यक आहे. या ठिकाणी रुग्णांची होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासोबत नातेवाईक सुद्धा असतात मात्र त्यांच्या निवास व विश्रामासाठी कोणतीच व्यवस्था नाही. रुग्णांसोबतच्या नातेवाईकांसाठी रुग्ण सेवा सदन आणि टीबी रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच या ठिकाणी रुग्णांची होणारी गर्दी लक्षात घेता कुशल व अकुशल मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने असणे आवश्यक आहे. यासाठी वाढीव मनुष्यबळास मंजुरी द्यावी अशी मागणी केली
लातूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना नाट्य रसिक व नाट्य चळवळीची मागणी लक्षात घेऊन नाट्यगृह उभारणीसाठी मंजुरी दिलेली होती. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीतील पहिला टप्पा मंजूर होऊन तो मनपाकडे वर्ग करण्यात आलेला होता. या निधीच्या माध्यमातून नाट्यगृह उभारणीसाठी 15 कोटी रुपये खर्च झालेला आहे. या माध्यमातून नाट्यगृहाचे काम अर्धवट स्थितीत राहिलेले आहे.
नाट्यगृह बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा उर्वरित 26 कोटी 11 लक्ष रुपयांचा निधी शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्णय क्र. मनपा-२०२४/प्र.क्र.२४६(क-६१/वि-१६(ई-८२८२६९) नुसार मान्यता प्राप्त झालेली आहे. मात्र हा निधी अद्याप मनपाकडे वर्ग करण्यात आलेला नाही. या निधी अभावी नाट्यगृहाचे काम अर्धवट रखडलेले आहे. लातूर शहरातील नाट्य चळवळ व रसिकांची भावना लक्षात घेऊन सदर नाट्यगृहाचे बांधकाम पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर निधी वर्ग करण्याबाबत तात्काळ निर्देश देण्यात यावेत ही मागणी केली.
लातूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अल्पसंख्याक समाजासाठी शादी खाना उभा करण्यास मंजुरी देण्यात आली होती. शादीखान्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर बांधकामा करिता आवश्यक असणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी देऊन निधी वर्ग केला होता. मनपा प्रशासनाने उपलब्ध निधीतून शादीखान्याच्या बांधकामात सुरुवात केली होती. दोन मजली इमारत असलेल्या शादीखान्यासाठी उर्वरित निधी मात्र अद्याप वर्ग झालेला नाही. परिणामी या शादीखान्याचे काम अर्धवट रखडले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी उर्वरित निधी वर्ग करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली.
माननीय पालकमंत्री महोदयांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता आणि तत्परता दाखवत तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.









