अकोला जिल्हा प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला :- चालत्या एसटी बसचा कठडा तुटल्याने जिल्ह्यात मोठा अपघात टळला. चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील २८ शालेय विद्यार्थ्यांसह सर्व प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना अकोट-हिवरखेड रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची बस क्रमांक एमएच 40 एन 8952 हिवरखेडहून अकोट शहराकडे येत होती. आडगाव येथून सुमारे 28 शालेय विद्यार्थी या बसमध्ये चढले होते. हिवरखेड-अकोट रस्त्यावर अचानक बसचा कठडा तुटल्याने बसचे नियंत्रण सुटले. मात्र, सतर्क चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अपघात टळला. या घटनेनंतर विद्यार्थी व इतर प्रवासी सुमारे दीड तास रस्त्यावरच अडकून पडले होते.

अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला, तर काही प्रवाशांनी इतर वाहनांनी पुढील प्रवास पूर्ण केला. या घटनेने एसटी महामंडळाच्या (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करून मागणी केली आहे.लांब पल्ल्याच्या आणि खराब रस्त्यांवरून धावणाऱ्या बसेसची योग्य प्रकारे तपासणी करण्यात यावी. अकोला जिल्ह्यात अनेक जुन्या बसेस धावत असून, काही ठिकाणी बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना बसच्या खेटे मारावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या गंभीर बाबीकडे एसटी महामंडळाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.


